मुंबई: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली असली तरी आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वर्तुळात एक कुजबुज सुरु असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांची हत्या हे एकप्रकारे मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे. बाबा सिद्दीकी हे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) रडारवर असू शकतात, ही गोष्टच मुंबई पोलिसांच्या लक्षात आली नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता आगामी काळात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. 


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी वांद्रे परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला (SRA) असणारा विरोध कारणीभूत असल्याची शक्यता समोर आली होती. मात्र, एसआरए योजनेवरुन असलेले वाद जीवे मारण्याची सुपारी देईपर्यंत टोकाला जाऊ शकतात का, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. तरीही ही शक्यता गृहीत धरुन पोलिसांकडून तपास सुरु आहे.


पोलिसांकडून झिशान सिद्दीकी आणि कुटुंबीयांची चौकशी होणार


मुंबई पोलिसांकडून आता झिशान आणि सिद्दीकी कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे. बुधवारी मुंबई पोलिसांकडून झिशान यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. बाबा सिद्दीकी यांच्या जीवाला कोणाकडून धोका होता, याबद्दल सिद्दीकी कुटुंबीयांकडून माहिती घेतली जाऊ शकते. सिद्दीकी कुटुंबीयांना कोणावर संशय किंवा तक्रार असलेल तर त्यादृष्टीनेही मुंबई पोलीस तपास करतील, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मुंबई गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आणि गुप्तवार्ता विभागाला (CIU) अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय किंवा जवळच्या उद्योगपतींविषयी माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भविष्यात बिश्नोई टोळीकडून अशाप्रकारचा हल्ला नियोजित असल्यास तो टाळता येईल.


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी अत्याधुनिक पिस्तुल वापरण्यात आले होते. मुंबईत इतक्या सहजप्रकारे शस्त्रे आणली जाणे, चिंतेची बाब आहे. ही बाब मुंबई पोलिसांना टिपता आली नव्हती. त्यामुळे आता मुंबईत ज्या मार्गाने अवैध पद्धतीने शस्त्रं आणली जात आहेत, त्या मार्गाचाही पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे.


बिश्नोईला मुंबई पोलिसांकडे सोपवण्यास केंद्राचा नकार


लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील साबरमती येथील तुरुंगात आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी त्याचा ताबा मागितला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. 



आणखी वाचा


बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला