Nagpur ATS Action : नागपुरात एटीएसच्या छाप्यात 27 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र ते चलन नकली (Fake Currency) नसून अस्सल भारतीय चलन आहे. त्यामुळे नकली नोटा शोधण्यासाठी गेलेल्या एटीएसची गोपनीय माहिती चुकली की एटीएसच्या छाप्यापूर्वीच नकली नोटा तिथून गायब करण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 


महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) नागपूर युनिटकडून बुधवारी नागपूरच्या हसनबाग भागात मोठी कारवाई करण्यात आली. या छाप्यात रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमीष दाखविणाऱ्या ठगबाज आणि व्यवसायाने ऑटो डिलर असलेल्या व्यक्तीच्या घरातून रोख 27 लाख 50 हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. एवढी मोठी रक्कम त्याने कुठून आणि कुणासाठी आणली होती याचा शोध एटीएसकडून घेण्यात येत आहे.


दरम्यान, या प्रकरणी परवेझ उर्फ पप्पू पटेल आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. परवेज विरुद्ध यापूर्वी ही फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याचा ऑटो डीलचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. तो या व्यवसायाच्या आड लोकांना एका महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करतो अशा काही तक्रारी नागपूर पोलिसांकडे यापूर्वीही होत्या.


दरम्यान, आज एटीएसला परवेझच्या घरी मोठ्या प्रमाणावर नकली नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसने आज सकाळी परवेजच्या हसनबाग येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे 27 लाख 50 हजार रूपये आढळून आले. मात्र त्यापैकी एकही नोट बनावट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परवेज ने एटीएसच्या छाप्यापूर्वीच नकली नोटांची मोठ्या प्रमाणातील रोकड गायब केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.. 


दुसऱ्या बाजूला जप्त करण्यात आलेल्या 27 लाख 50 हजार रुपयांची रक्कम परवेझला कोणी दिली होती आणि ती पुढे कोणाकडे जाणार होती याचा शोध आता एटीएसला घ्यावा लागणार आहे. परवेझच्या घरात नेहमीच इतर राज्यातून मोठ्या संख्येने काही संशयास्पद लोक येत होते. त्यामुळे मोठ्या रकमेच्या या प्रकरणात इतर राज्यातील काही कनेक्शन आहे का? याचा शोधही एटीएसला घ्यावा लागणार आहे.


ही बातमी वाचा: