मुंबई : सहाशेपेक्षा जास्त महिला आणि मुलींना फोटो मॉर्फ करून शरीरसुखासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या संशयित आरोपीला अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रवी दांडू असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो मुंबईतील धारावी परिसरात राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


संशयित आरोपी रवी दांडू हा एका खासगी बॅंकेत आयटी विभागात काम करत होता. त्याने आतापर्यंत सहाशेपेक्षा जास्त महिला आणि मुलींना ब्लॅकमेल केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. महिलांचे फोटो मॉर्फ करून आणि पॉर्न व्हिडीओ महिलांच्या मोबाईलवर पाठवून त्यांचे मोबाईल हॅक करत असे. मोबाईल हॅक करून सोशल मीडियावरील सुंदर मुलीचे प्रोफाइल तपासून त्यांचे फोटो  डाऊनलोड करायचा. त्यानंतर तो संबंधित महिलांकडे शरीरसुखाची मागणी करायचा. तसे न केल्यास फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी द्यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रवी कॉलेजच्या विद्यार्थींनींना गाठून त्यांना तो आपणही विद्यार्थी किंवा प्राध्यापक असल्याचे सांगत अभ्यास सामग्रीची देवाण घेवाण करायचा. यातून ओळख वाढवून आपल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर अॅड व्हायला सांगायचा. त्यासाठी तो एक लिंक बनवून मुलींना पाठवायचा. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यावर येणारा ओटीपी शेअर करायला सांगून तो मिळताच मुलीच्या संपूर्ण मोबाइलचा ताबा तो स्वत:कडे घेत असे. त्यानंतर मुलींच्या प्रोफाईलवरील फोटो डाऊनलोड करून ते फोटो मॉर्फ करत असत. त्यानंतर ते फोटो संबंधित मुलीच्या इतर  मित्र मैत्रिणींना पाठवून शरीरसुखासाठी ब्लॅकमेल करायचा. 


रवीच्या या कारनाम्यांची माहिती एका मुलीने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी रवी दांडूवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.  
 
पोलिकांनी चौकशी केल्यानंतर रवी गेल्या अनेक दिवसांपासून हे कृत्य करत असून आतापर्यंत 600 मुली आणि महिलांना त्याने अशाप्रकारे अश्लील व्हिडीओ पाठवल्याची कबूली दिली आहे. याबरोबरच अशा प्रकारे 81 मुलींचे त्याने मोबाइल हॅक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10 मोबाइल  आणि 12 सिमकार्ड ताब्यात घेतली आहे. काही डाटा रवीकडून डिलीट झाला असल्याची शक्यता असून तो डाटा रिकव्हर करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच संबधित महिलांचे सोशल मिडियावरील फोटो आणि व्हिडीओही डिलीट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
आपला नंबर अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करताना  आणि व्हॉटसअ‍ॅपवर आलेल्या लिंक ओपन करताना सावध रहा. अनोळखी व्यक्तींना अशा प्रकारे कुठलाही अॅक्सेस देऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.