Amravati Bike Theft : अमरावती पोलिसांनी (Amravati Police) दुचाकी चोरणाऱ्या (Bike Theft) अल्पवयीन टोळीला (Minor Boy Gang) अटक केली आहे. अमरावतीच्या परतवाडा शहरात (Paratwada City) गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या (Two Wheeler Theft) घटनेत वाढ झाली होती. पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद वाढतच चालली होती. वाढत्या तक्रारी पाहता पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान केलं आणि परतवाडा शहरातील अल्पवयीन युवकांच्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीसह वाहनांचे पार्ट वेगवेगळे करुन विकणारी टोळीही जेरबंद केली आहे. पोलिसांनी मेळघाटच्या जंगलातून चोरलेल्या वाहनाचे सांगाडे ताब्यात घेतले आहेत.
चोरी करणाऱ्या अल्पवयीन युवकांची टोळीला अटकेत
परतवाडा शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वाढत्या तक्रारींचा ओघ पाहता नवीन रुजू झालेले आणि दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप चव्हाण यांनी तपास सुरु केला. त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करत शहरातील बाईक चोरी करणाऱ्या अल्पवयीन युवकांच्या टोळीला पकडलं. या अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी करुन घेणाऱ्या टोळीलाही पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी अल्पवयीन मुलांना वाहन चोरी करण्यासाठी अवघे 500 रुपये द्यायचे आणि दुचाकीचे भाग वेगळे करुन विकायचे.
अल्पवयीन मुलांचा चोरीसाठी वापर
परतवाडा शहरातील आठवडी बाजार परिसरातून 25 नोव्हेंबर रोजी एक हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली असता एक अल्पवयीन मुलगा दुचाकी पार्किंग केलेल्या मोटरसायकल लोटत बाजुला नेत काही अंतरावर असणाऱ्या दोन युवकांच्या ताब्यात देत असल्याचं दिसून आलं. या अल्पवयीन मुलांचा मोटरसायकल चोरीसाठी वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलीस अधिकारी संदीप चव्हाण यांनी तपासाचे चक्र गतीमान करत या गुन्ह्यातील आरोपी अंकुश गणेश दुस्तकर, पवन तनपुरे आणि शेख इकबाल युसुफसह इतर तीन अल्वयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. यात तीन मुख्य आरोपी हे मित्र असून एक मुख्य दुचाकी चोर, दुसरा दुचाकी मॅकेनिकल आणि तिसरा भंगार व्यापारी आहे. हे तिघेही अल्पवयीन मुलांचा दुचाकी चोरीत वापर करून घेत होते.
पोलिसांनी अंकुश आणि पवनला ताब्यात घेऊन तीन मोटरसायकली जप्त केल्या. आरोपींनी चोरलेल्या दुचाकीची विल्हेवाट मेळघाटच्या हत्तीघाट येथील जंगलात नेऊन एका खड्डयात पुरवून ठेवत आणि त्याचे स्पेअरपार्टस विकायचे. या गुन्ह्यात भंगार विक्रेता दुकानदार शेख इकबाल युसुफ यालाही ताब्यात घेण्यात आले. हा भंगार विक्रेता या वाहन चोरीतील सुटे भाग विकत होता. पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्ह्याची उकल करत जंगलातून खड्ड्यात गाडलेले, नंबर खोडलेले इंजिन, चेसीस, सायलेंसर, मडगार, शॉकअप, रिंग टायर, पेट्रोल टाकी, ब्रेकपट्टी, बॅटरी असा एकुण 3 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.