ठाणे: बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील बड्या धेंडांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद आहे. अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याच्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी हे ज्युपिटर रुग्णालयात पोहोचल्यानंतर चालत जाऊन स्ट्रेचरवर झोपले, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते सोमवारी रात्री ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.


यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस आणि राज्य सरकारवर  गंभीर आरोप केले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य चौकशी ही शाळेच्या मुख्याधापकांची आणि विश्वस्तांची व्हायला हवी. अक्षय शिंदे यांनी त्यांच्याबद्दल काही माहिती देण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना संपवलं. शाळेचे अध्यक्ष तुषार आपटे आणि विश्वस्त उदय कोतवाल हे फरार आहेत, यामध्येच सगळं गुपित आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 


बलात्कार झाला तिथल्या प्रशासनाने म्हणजेच शाळेने पोलीस प्रशासनाला काही सांगितलं नाही, नंतर सीसीटीव्ही गायब झाले.  ज्या शाळेने गुन्हा लपवला त्या शाळेच्या संचालकांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा लपवणे  हा देखील गुन्हा आहे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट उशिरा घेण्यात आली. त्या पालकांना 13-13 तास बसवून ठेवण्यात आले. अक्षय शिंदे या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदार ही होता आणि गुन्हेगार होता. फास्ट कोर्टातून त्याला फाशी मिळाली असती जनतेला आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला असता.  अक्षय शिंदे याच्याकडे काही अधिकची माहिती तर नव्हती ना? याच्यात कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.


पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही: जितेंद्र आव्हाड


अक्षय शिंदेला मारण्यासाठी जे काही डोकं लढवलं गेलं, ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत. अशा गुन्ह्यातल्या आरोपींना व्यवस्थित सुरक्षित ठेवायला हवं होतं. कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे हे कोणालाच माहीत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही.  ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असे दोन पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले.  स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही, पण अक्षय शिंदे याच्या हाताला रिव्हॉल्व्हर लागलंच कसं? एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात, तो काय पैलवान आहे का  रिव्हॉल्व्हर काढून घ्यायला? त्याला फाशी होणारच होती व्हायलाच हवी होती. ते करण्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना ते रस्ते बंद करून त्याचा असं काही फिल्मी शुटआऊट करता, एन्काऊंटर करता. तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशय निर्माण करून घेतले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


गाडीमध्ये एन्काऊंटर होतो का? खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं. तो गाडीमधून पळत होता, उडी मारून पळून गेला म्हणून गोळी मारली, असे तरी सांगायचे. हे सगळेच हे सगळं संशयास्पद आहे. एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो, पाच पाच पोलीस बसलेले असताना काय हिम्मत होईल कोणाच्या कमरेच्या रिव्हॉल्व्हरला हात घालायची? कोणालाच गोळी लागली नाही , हे सगळे सांगतात ते सगळं खोटं आहे. याचं कारण असं सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालत गेले आहेत. समोर स्ट्रेचर होते त्यावर जाऊन झोपले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.






आणखी वाचा


अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?