अहमदनगर : साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी अहमदनगर शहरातील रासने नगर या भागात हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


हेरंब कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्यधापक आहे त्या महाविद्यालयाभोवती अक्षय सब्बन या आरोपीची अतिक्रमण करून टाकण्यात आलेल्या पान टपरीबाबत कुलकर्णी यांनी महानगरपालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेने कारवाई देखील केली होती. महापालिकेने कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरून अक्षय सब्बन याने त्याच्या पाच साथीदारासह कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता.


या संदर्भात शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात 324,341,323 कलमासाह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुलकर्णी यांना लोखंडी रॉडने माराहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यामध्ये कलम 307 चा वाढीव गुन्हा दाखल केले होते. दरम्यान पोलिसांनी शहरातील कोंड्यामामा चौक येथे आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये अक्षय सब्बन, चैतन्य सूडके आणि एक अल्पवयीन अशा एकूण तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. 


रॉडने केला होता प्राणघातक हल्ला 


हेरंब कुलकर्णी हे नावाजलेले मराठी लेखक असून ते सध्या अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका शाळेत कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी 12.18 वाजण्याच्या सुमारास शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून घरी जाताना अहमदनगर शहरातील रासने नगरमध्ये जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.


प्रतिमा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट


या सर्व प्रकरणी हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या घटनेला वाचा फोडली. 'शनिवारी ही घटना घडली. शाळेतून येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली पण 48 तास उलटूनही अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. त्याचबरोबर अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे. आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे, असे त्यांनी म्हटले आहे. 


हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींनी अटक केली. 


ही बातमी वाचा: