कल्याण : जन्मदात्या माऊलीने तीन महिन्याच्या चिमुकलीला सोडून पळ काढला आहे. आईच्या मायेसाठी पारखी झालेल्या या चिमुकलीला तिचा जन्मदाता बाप ही सोडून जाण्याच्या तयारीत होता. मात्र काही नागरिकांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ या इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही घटना कल्याण स्कायवॉक परिसरात घडली आहे. खलील शेख असे या निर्दयी बापाचे नाव असून महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चिमुकलीला डोंबिवलीतील जननी आशिष या सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले आहे .
खलील शेख हा आपली पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह कळवा येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी खलीलची पत्नी घर सोडून निघून गेली . त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकलीची जबाबदारी खलीलवर होती. मात्र खलीलही निर्दयी निघाला. तीन महिन्याच्या ही निरागस मुलगी आधीच आईच्या मायेसाठी पारखी झालेली असताना खलील देखील तिची जबाबदारी झटकू पाहत होता. कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक परिसरात खलील या मुलीला ठेवून पळून जाण्याचा बेतात होता. मात्र काही नागरिकांची नजर खलीलवर पडली त्यांनी खलीलला पकडून महात्मा पोलिसांच्या ताब्यात दिले.
महात्मा फुले पोलिसांनी खलीलला अटक करत त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता 'बाळाची आई तिला सोडून गेली आहे, त्यामुळे आपण तिचा सांभाळ करू शकत नसल्याने आपण तिला सोडून जात होतो असल्याचे त्याने सांगितले. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. महात्मा फुले पोलिसांनी खलील शेखला अटक केली असून तिच्या आईचा पोलीस शोध घेत असून 2 महिन्याच्या या चिमुरडीला डोंबिवलीतील जननी आशिष संस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली .