मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.


बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयात अभिषेक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तिकडून अभिषेक घोसाळकरांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या होत्या.


कोण आहे गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा? (Who Is Moris) 


मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. 


पैशाच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याची माहिती


मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झा़डून घेतली. 


फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळीबार


मॉरिस नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यानंतर या दोघांनीही फेसबुक लाईव्ह केलं आणि यापुढे एकत्र काम करण्याचं ठरवलं. शेवटच्या क्षणी मॉरिस नोरवा हा व्हिडीओतून बाजूला झाला आणि त्याने समोरून गोळीबार केला. त्यात अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती गंभीर बनली. 


महाराष्ट्रात गुंडागर्दीचं राज्य? 


महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची आज हत्या करण्यात आली. 


ही बातमी वाचा: