Nagpur News : जुन्या वाद उकरून काढत वारंवार जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांनाच चौघांनी धारदार शस्त्रांनी घाव घालीत खून केला. वाठोडा ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर झोपडपट्टीतील गौसशाह वली दर्ग्याजवळ ही थरारक घटना घडली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी (Wathoda Police Station) आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. तर घटनेच्या दोन दिवसानंतरही एक मारेकरी अद्याप फरार आहे.


आरीफ हुसेन आदीब हुसेन (27) रा. श्रीरामनगर झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे. सोनू ऊर्फ अशपाक आशू शेख (24), दादू ऊर्फ शुभम गजभिये (25), मोहम्मद ईब्राहीम मोहम्मद शकील ऊर्फ रिजवान (23), शाहरूख खान वल्द छोटे खान पठाण (25) अशी आरोपींची नावे आहेत. मृतक आणि आरोपी सर्व एकाच वसाहीतीत रहातात. यामुळे एकमेकांचे परिचित आणि जुने मित्रही होते. 


याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, थ्री व्हीलरवर कबाडीचा व्यवसाय (Scrap Dealers) करणारा आरीफ आणि सोनू यांच्यात सात ते आठ महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर आरीफ सातत्याने वाद उखरून काढायचा. सोबतच सोनूला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. यामुळे सोनूच्या मनात राग होता. आरीफ आपला गेम करेल, अशी भितीही होती. ही भिती कायमची घालविण्यासाठी आरीफच्या खुनाची योजना त्याने आखली. त्यात अन्य तीन मित्रांना सोबत घेतले. गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास आरीफ घराजवळ एकटा उभा होता. सोनू आणि त्याचे साथीदार शस्त्रांसह तिथे पोहोचले. आरीफ बेसावध असतानाच त्याच्यावर अचानक वार करणे सुरू केले. आरीफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 


साळ्याचा दोन महिन्यांपूर्वीच खून


आरीफच्या साळ्याचा दोनच महिन्यांपूर्वी खून झाला होता. सावत्र वडिलांनीच हा खून केल्याचे समोर आले होते. त्यावेळी आरोपी सोनूने साळ्याचा खून आरीफमुळे झाल्याचा टोमणा मारला होता. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला होता. गुरुवारी आरीफच्या खुनानंतर त्याची पत्नी शबनम बानो आरीफ हुसेन (23) हिने पोलिसांना तक्रार दिली. त्यात तिने भावाचा खून करणाऱ्या चारही आरोपींनीच हे हत्याकांड घडविल्याचे नोंदविले. पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवित सोनू , दादू गजभिये आणि ईब्राहीम यांना अटक केली. छोटे खान हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या