सांगली : सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बाळाची हत्या दुसरं तिसरं कोणी केली नसून त्याच्या आईनेच बाळाला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला असणारा आजार बघवत नसल्याने नैराश्यातून आईने बाळाला बुडवून मारल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं.
पलूस तालुक्यातील माळवाडीमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाला जन्मानंतर शौचास त्रास होत होता . त्यामुळे फक्त दोनच दिवसांत त्यांनी विश्रामबाग मधील हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी बाळाला शौचासाठी पोटातून बाहेर नळी काढल्याने त्रास होत होता. तो त्रास बघवत नसल्याने मुलाची आई नैराश्यात होती. या नैराश्यातूनच त्याच्या आईनेच घरात कुणी नसताना बेडरूममधून त्या बाळास उचलून घराच्यावर असणाऱ्या टेरेसवरती पाण्याने भरलेल्या टाकीत टाकले होते.
माळवाडी -वसगडे रस्त्यालगत माळी यांचा शेतातील वस्तीवर साईदीप नावाचा बंगला आहे. सकाळी घरातील सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. त्यांची मुलगी ऐश्वर्या अमित माळी ही 13 दिवसांच्या बाळासोबत बेडरूममध्ये झोपली होती. तिची आई आणि वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुत होत्या. ऐश्वर्या घराबाहेर असणाऱ्या बाथरूममध्ये गेली, त्यावेळी बेडरुममध्ये खाटेवर बाळ झोपलं होतं. मात्र ती परत घरातील बेडरूममध्ये आली, तेव्हा खाटेवरून बाळ गायब झाल्याचे लक्षात आले.
बाळ सापडत नसल्याने तिने सर्वांना बोलावलं आणि हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सर्व आल्यानंतर बाळाचा सगळीकडे शोध घेण्यात आला. काही नागरिकांना शंका आली म्हणून बंगल्याच्या गच्चीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले असता पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला. याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली आहे.
भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तासगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपास कामी योग्य त्या सूचना दिल्या. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोलिसांनी सर्व कुटुंबिय आणि शेजाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरु केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात बाळाची हत्या करणाऱ्याचं आणि त्यामागचं कारण देखील समोर आलं आहे.
दरम्यान, माळवाडी- वसगडे रस्त्यावर असणाऱ्या पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसाच्या बाळाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. याबाबतची फिर्याद उत्तम धोंडीराम माळी यांनी भिलवडी पोलिसांत दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आईनेच या मुलाचा खुन केल्याचे समोर आले.
महत्त्वाच्या बातम्या :