डोंबिवली : शहरातील शेलारनाका परिसरात क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेला 48 तासांचा अवधी उलटत नाही तोच पुन्हा एकदा घटना समोर आली आहे. 84 वर्षीय वृद्ध नागरिकाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या 80 वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निर्दयी पतीने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
पार्वती पाटील असे या घटनेतील महिलेचे नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पती बळीराम पाटील यांना अटक केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे ते आई वडील आहेत. इतकी वर्षे सुखाचा संसार केल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची काळजी घेत गत आठवणींना उजाळा देण्याच्या काळात जोडीदाराला कायमचा संपवण्याच्या या वृद्ध नागरिकाच्या कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, पोटात चाकू असलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली गावात बळीराम पाटील हे आपल्या पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडासह दोन मजली बंगल्यात राहतात. काल रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे पार्वती आणि बळीराम जेवण झाल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. यानंतर पती पत्नीत नेहमीप्रमाणे काही करणावरून वाद झाले. संतापाच्या भरात बळीराम यांनी आपल्या पत्नीची कोयत्याने मानेवर, पाठीवर, गळ्यावर, कानावर वार करत हत्या केली. हत्येनंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्याच खोलीत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यत सकाळ झाल्याने सुना उठल्याचे कळताच अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह सोडून त्यांनी घर सोडून पळ काढला. सासू सासऱ्याच्या खोलीतून धूर येत असल्याने सुनेने या खोलीत धाव घेत पाहणी केली असता सासूचा अर्धवट जळलेल्या आणि चेहऱ्यावर धारदार हत्याराच्या खुणा असलेला मृतदेह खाटेवर पडलेला दिसला. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी पती बळीराम याला अटक करत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.