सोलापूर : सोलापुरात ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने 6 किलो सोने जप्त केले आहे. काल रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर चौकशी करुन या विषयी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. 13 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सोन्याची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचला होता. माहितीनुसार एक चार चाकी गाडी क्र. WB 02 AP 1596 ही येताना दिसली. गाडीला बाजूला घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला गाडीत असलेल्या दोघा व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशी केली आणि गाडीची तपासणी केली असता त्यात 6 किलो साेने आढळून आले आहे.
आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथून मुंबईकडे हे सोने घेऊन जात असल्याच प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर सोन्याची तस्करी करता येईल अशा पद्धतीने चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटखाली विशेष अशा लॉकरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. याच लॉकरमध्ये हे सोने ठेवण्यात आले होते. पंच, सोनार यांच्या समक्ष कॅमेराच्या आत सदरील मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चालकासहित एका व्यक्तीस पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे. या दोन्ही संशयिताना पोलिसांनी सोन्याची कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर केली नसल्याची माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
या घटनेत कारमधील चालकाच्या शीट शेजारील शीटच्या खाली तयार करण्यात आलेल्या लॉकर सदृश कप्यात सोन्याचे 6 मोठे बिस्कीट, दोन मध्यम आणि तीन लहान बिस्कीट मिळून आले आहेत. ज्याचे वजन सुमारे 6 किलो 339.81 ग्रॅम आहे. ज्याची बाजारभावानुसारे सुमारे 3 कोटी 16 लाख 35 हजार 649 रुपये किंमत आहे. तर एक ह्युंदाई कार ज्याची अंदाजे किंमत 10 लाख आणि दोन मोबाईल असे एकूण 3 कोटी 26 लाख 49 हजार 649 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान पोलिस या दोन्ही संशयितांना न्यायलयात हजर करणार असून न्यायलायच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यी नेतृत्वाखाली सपोनि शाम बुवा, सहा. फौ. शिवाजी घोळवे, संदीप काशी, निलकंठ जाधवर, पो.हे. प्रकाश कारटकर, विजय भरले, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, पो.ना. परशूराम शिंदे, लाला राठोड, सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.