Maharashtra Solapur Crime News: वेगवेगळ्या बँकांचे कार्ड वापरून येथील दी. पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेच्या (The Pandharpur Urban Co-op. Bank) विविध 22 शाखांमधील एटीएममधून (ATM) तीन कोटी तीन हजार रुपये अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यानं यासाठी 668 एटीएम कार्ड्स वापरल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत अर्बन बँकेचे व्यवस्थापक राजेश आगवणे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात (Pandharpur City Police) गुन्हा दाखल केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यभरात 30 शाखा असून यामधील 28 एटीएम मशीनमधून विविध बँकांचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा चोरट्यांनी फायदा घेत दुसऱ्या बँकांचे एटीएम वापरून सदर रक्कम लंपास केली. अज्ञात चोरट्यानं 668 एटीएम कार्डद्वारे पंढरपूर अर्बन बँकेच्या विविध गावातील एटीएम मशीनमध्ये पैसे काढताना तांत्रिक बिघाड निर्माण केला. सदर चोरट्यांनी एटीएममधून पैसे बाहेर येताच, कॅश डोअर अर्थात ज्यामधून पैसे बाहेर येतात, त्या शटरमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पैसे येणाऱ्या शटरमध्ये बोट लावताच किंवा पट्टी लावल्यास ज्या बँकेचे एटीएम आहेत, त्या एटीएममध्येही एरर येतो. यामुळे पैसे काढून देखील बँकेच्या खात्यांमधील पैसे कमी होत नाहीत. या तांत्रिक गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी 24 मार्च ते 19 मे या कालावधीत पंढरपूर अर्बन बँकेच्या पंढरपूर, सोलापूर, पुणे, बारामती, लातूर, कोल्हापूर, इंदापूर, बार्शी, फलटण, कोरेगाव, कराड, औरंगाबाद, वैराग आदी शाखांमधील एटीएममधून तीन कोटी तीन हजार दोनशे रुपये लंपास केले आहेत.


याच पद्धतीने महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील बँकांमधून देखील पैसे काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. यातील आरोपी सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असून त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली आहे. 


बँकेच्या एटीएममधून चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या पत्रकातून त्यांनी बँकेच्या खातेदारांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, या प्रकरणात पंढरपूर अर्बन बँकेचे एकही एटीएम कार्ड वापरण्यात आले नसून सर्व 668 एटीएम कार्ड दुसऱ्या बँकांचे आहेत. 



  • बँकेच्या एकूण 22 एटीएममधून एटीएम मशीनला छेडछाड करून सरकारी आणि खाजगी बँकेचे 668 एटीएम कार्ड वापरुन रक्कम रु 3 कोटी 30 हजार रुपये इतकी रक्कम अज्ञात इसमाणे काढलेली आहे.  

  • सदर झालेल्या प्रकारात बँकेचे कोणत्याही ठेवीदार/सभासद/ग्राहक खातेदारचे खात्यातील रक्कम गेलेली नाही आणि खातेदाराचे नुकसान झालेले नाही

  • सदर प्रकरणाची माहिती एनपीसीआय, रिझर्व्ह बँक इंडिया यांना कळविण्यात आलेली आहे. 

  • हा एक तांत्रिक चोरीचा प्रकार आहे आणि याबाबत बँकेची Insurance policy उपलब्ध आहे. 

  • बँकेमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे, यामध्ये बँकेला कोणताही तोटा झालेला नाही. या व्यवहारात बँकेचा पैसा हा तांत्रिक कारणानं अडकला आहे. सरकारी आणि खाजगी बँकांचं कार्ड वापरून ही घटना घडली आहे, त्या सर्व बँकांकडे बँक क्लेम केलेले आहेत.

  • अज्ञात व्यक्तींचे CCTV Footage बँकेकडे उपलब्ध आहेत आणि ते पोलिसांकडे सादर केले आहेत. 

  • आपल्या बरोबरच इतरही काही बँकांच्या ATM मधून हा प्रकार घडला आहे. काही बँकांचे आरोपी पकडलेही गेले आहेत आणि त्यांचा तपास चालू आहे

  • या तपासामध्ये पकडले गेलेले आरोपी यांचे आपल्या व्यवहारात त्यांचे धागेदोरे असल्याचा प्राथमिक संशय आहे.

  • यामध्ये झालेला प्रकार लक्ष्यात येताच बँकेनं या संदर्भात पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली आहे आणि यामध्ये उच्चस्तरिय चौकशी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थापन आणि संचालक प्रयत्नशील आहेत.