Mumbai Crime : स्टेट बँक ऑफ इंडियासह (State Bank of India) इतर पाच कन्सोर्टियम सदस्य बँकांची 1017.93 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरुन 11 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने रायगडमधील (Raigad) लोहा इस्पात लिमिटेड या कंपनीसह तिचे संचालक आणि मुंबईतील एका खाजगी कंपनीच्या हमीदार, अज्ञात सरकारी सेवत आणि अज्ञात व्यक्तीसह 7 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


काय आहे प्रकरण?


आरोपींनी 2012 ते 2017 या कालावधीत 812.07 कोटींचं वर्किंग कॅपिटल (खेळतं भांडवल), मुदत कर्ज आणि एनएफबी मर्यादेचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँकांची म्हणजेच बँक ऑफ इंडिया (Bank of India), कॅनरा बँक (Canara Bank), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) यांची फसवणूक करण्याचा कट रचला. आरोपींनी काल्पनिक विक्री/खरेदीचे व्यवहार दाखवून बँकांची फसवणूक केली तसंच थकित कर्जाचा भरणा न केल्याने एसबीआय आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँकांना एकूण 1017.93 कोटी रुपयांना फटका बसला, असा आरोप स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या तक्रारीत केला आहे.


'या' आरोपींवर गुन्हा (FIR) दाखल


या तक्रारीवरुन सीबीआयने लोहा इस्पात कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पोद्दार, पूर्णवेळ संचालक संजय बन्सल तसंच संचालक आणि हमीदार राजेश अगरवाल, अंजू पोद्दार आणि मनीष गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.


नऊ ठिकाणी सीबीआयचे छापे (CBI Raid)


28 ऑगस्ट 2014 पासून कंपनीचं बँक खातं नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) घोषित करण्यात आलं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फ्रॉड आयडेंटिफिकेशन कमिटीने (Fraud Indentification Committee) 13 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत हा प्रकार फसवणूक म्हणून वर्गीकृत केला, असं सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटलं आहे. सीबीआयने याप्रकरणी नऊ ठिकाणी छापाही (Raid) टाकला. दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबई, रायगड आणि ठाणे यासह नऊ ठिकाणी आरोपींच्या निवासस्थानी आणि संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी काही कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या.


हेही वाचा


Mumbai Crime : गुंतवणूकदारांना 2.77 कोटींचा गंडा, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून स्टॉक ब्रोकरला बेड्या