Gadchiroli: गडचिरोलीमध्ये येत्या 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीत नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसुल करणाऱ्या 10 नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे.
नक्षल सप्ताह दरम्यान नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन खंडणी वसुल करणे, रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. हीच संधी साधून नक्षल समर्थक नक्षलवाद्यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेची फसवणूक करतात. अशाच प्रकारे उपपोस्टे पेरमिली हद्दीत बांडिया नदीच्या पुलाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी दक्षिण गडचिरोली डिवीजन कमिटी या मथळयाचे लेटरहेड दाखवून 70 लाख रुपयेची मागणी केली व ती मागणी पुर्ण न केल्याने 5 नोव्हेंबर रोजी फिर्यादीचे दोन अनोळखी बंदुकधारी व्यक्तिंनी त्याचे कामाचे साईटवर झोपलेल्या ठिकाणावरुन त्याला बंदुकीचा धाक दाखवून रात्री मौजा चंद्रा जंगल परीसरामार्गे मौजा रापल्ले जंगल परीसरामध्ये अपहरण करुन नेले. त्याला बंदुकीचा धाक दाखवून ''पुलियाचे काम पूर्ण करायचे असेल तर 70 लाख रुपये तीन दिवसांत द्या, नाहीतर तुमच्या कंपनीच्या साहीत्याची जाळपोळ करुन तुम्हाला जिवानिशी ठार करु'', अशी धमकी देवुन खंडणी मागितली. घटनास्थळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले 10 ते 12 लोक आजूबाजूला उभे होते. ते नक्षलवाद्यांसारखे दिसत होते. असे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार तपास केला असता, नक्षल समर्थकांनी नक्षलवाद्यांच्या वतीने नक्षली पेहराव करुन बनावट नक्षलवादी कॅम्प तयार केला. तसेच स्वतःजवळ असलेल्या भरमार बंदुकीचा धाक दाखवून ही खंडणीची मागणी केली. यामध्ये चैनू कोम्मा आत्राम (39), दानू जोगा आत्राम (29), शामराव लखमा वेलादी (45), संजय शंकर वेलादी (39), किशोर लालू सोयाम (34), बाजू केये आत्राम (28), मनिराम बंडू आत्राम (45) , जोगा कोरके मडावी (50), लालसू जोगी तलांडे (30), बजरंग बंडू मडावी (40) या आरोपीना अटक करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: