मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये (Zomato Share Crash) मध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार घसरण सुरू आहे. गेल्या तीन दिवसात गुंतवणूकदारांनी झोमॅटोच्या शेअरची जोरदार विक्री केली. यामुळे शेअरमध्ये 18% घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. झोमॅटोचे बाजार मूल्य 44 हजार 620 कोटी रुपयांनी घटना आहे झोमॅटोचे सध्याचे बाजार मूल्य 201885कोटी आहे. आज देखील कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली. सध्या झोमॅटोचा शेअर 203.83 रुपयांवर ट्रेड करत आहे.
घसरणीचं कारण काय?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचं प्रमुख कारण ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान संपलेल्या तिमाहीच्या काळात घटलेला नफा हे आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील नफा 59 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 138 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या नफ्यात 57.25 टक्के घसरण झाली. यामुळं कंपनीच्या शेअरची विक्री सुरु झाली.
झोमॅटोनं ब्लिंकिटच्या (Blinkit) स्टोअरचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र, झोमॅटोला ब्लिंकिटमधून सध्या हवं असलेलं उत्पन्न मिळालेलं नाही. ब्लिंकिटच्या विस्तारावर मोठा खर्च झोमॅटोकडून करण्यात आला होता. याशिवाय फूड डिलिव्हरी बिझनेसची वाढ देखील घटली आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये झोमॅटोच्या ऑर्डर केवळ 2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
ब्रोकरेज कंपन्यांनी मात्र झोमॅटोच्या शेअरबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. काही ब्रोकरेज हाऊसेसनं झोमॅटोच्या शेअरला 210-220 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तर, अधिक जोखीम सहन जे गुंतवणूकदार करु शकतात त्यांनी झोमॅटोमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला काही ब्रोकरेज हाऊसनं दिला होता. वेल्थ मिल्स सिक्युरिटीजनं अधिक जोखीम जे घेऊ शकतात त्यांनी शेअर खरेदी करावी, असं म्हटलंय.
जागतिक ब्रोकरेज हाऊसेस झोमॅटोचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म नोमुरानं झोमॅटोला सध्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागत असला तरी ब्लिंकिट सध्या क्विक कॉमर्स क्षेत्रात दुसरा क्रमांक मिळवण्यास तयार आहे. जेफरीज देखील ब्लिंकिटच्या कामगिगिरीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळं या संस्थेनं झोमॅटोचं टारगेट प्राईस 255 रुपये केलं आहे.
इतर बातम्या :
IPO Update : गुंतवूकदारांना कमाईची मोठी संधी, दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार, GMP कितीवर पोहोचला?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)