Gautam Adani : सध्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) बैठक सुरु आहे. या बैठकीत गौतम अदानी (Gautam Adani) हे चर्चेचा विषय ठरत आहेत. तिथे त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांची रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांची भेट घेतली आहे. यानंतर तेलंगणात (Telangana) 12400 कोटी रुपयांच्या गुंतवणुक करणार असल्याची घोषणा गौतम अदानी यांनी केली. 


दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि गौतम अदानी यांच्यात 4 सामंजस्य करार झाले आहेत. सध्या तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर येथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. एकीकडे काँग्रेस अदानींवर टीका करत असताना, दुसरीकडे त्यांची सत्ता असलेल्या राज्यात अदानींनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अदानी नेमकी किती गुंतवणूक करणार?


अदानी ग्रुप तेलंगणा राज्यात मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी तेलंगणात 1350 मेगावॅट क्षमतेच्या दोन पंप स्टोरेज प्रकल्पांमध्ये 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


डेटा सेंटरही तयार करणार आहे. ज्यासाठी 5 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.


अदानी समूहाची सिमेंट कंपनी तेलंगणात सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्यासाठी 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


अदानीची एरोस्पेस अँड डिफेन्स कंपनी काउंटर ड्रोन सिस्टीम आणि क्षेपणास्त्र विकास आणि उत्पादन केंद्रांमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


तेलंगणातील नवीन सरकार गुंतवणूकदारांसाठी अनुकूल : गौतम अदानी


तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यात राज्यातील गुंतवणुकीच्या संधींबाबत दावोसमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. अदानी समूहाच्या सीईओसोबत झालेल्या बैठकीनंतर, सीएम रेवंत रेड्डी यांनी आश्वासन दिले आहे की राज्य सरकार प्रकल्पांसाठी समूहाला सर्व प्रकारची मदत आणि सुविधा पुरवेल. तर तेलंगणातील नवीन सरकार गुंतवणूकदारांसाठी अनुकूल असल्याचे मत गौतम अदानी यांनी व्यक्त केलं. येथे जास्तीत जास्त गुंतवणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याच्या विकासाच्या वाटेवर अदानी समूह सदैव सोबत राहील, असे त्यांनी सांगितले. 


दावोसमध्ये पाच दिवसीय बैठक


15 जानेवारी 2024 पासून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची पाच दिवसीय बैठक आयोजित केली जात आहे. दुलियाच्या विविध देशांतील 2800 हून अधिक नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीला 60 हून अधिक देशांचे प्रमुखही आले आहेत. भारताकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी या बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि 100 हून अधिक सीईओही सहभागी झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


दावोस येथे पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार, तीन प्रकल्पांसाठी झाल्या स्वाक्षऱ्या