Petrol and Diesel Rates: लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत सध्या चर्चाच सुरु आहे. जर तुम्ही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची वाट पाहत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कारण, पेट्रोलियम उद्योगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना डिझेलवर प्रतिलिटर तीन रुपयांचा तोटा होत आहे, तर पेट्रोलवरील त्यांचा नफा घटला आहे. त्यामुळं एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ


तेल उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती नुकत्याच मजबूत झाल्यानंतर त्यांना कच्च्या तेलाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागत आहे. यानंतर पेट्रोलवरील नफा आणि डिझेलवरील तोटा कमी झाल्यामुळं तेल विपणन आणि वितरण कंपन्या किरकोळ किमतीत कपात करण्याचे टाळत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


देशातील या कंपन्यांनी दरात कोणताही बदल केला नाही


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) देशातील सुमारे 90 टक्के इंधन बाजार नियंत्रित करतात. कच्च्या तेलात चढ-उतार होत असतानाही या कंपन्यांनी दीर्घकाळापासून पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळं सध्या तरी दरात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. डिझेलच्या दरात सध्या तेल कंपन्यांना प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यासोबतच, पेट्रोलवरील नफ्याचे मार्जिनही जवळपास 3 रुपयांपर्यंत कमी झाले आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस कच्चे तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या पण, जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात या दरात पुन्हा वाढ झाली. 


पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी दिलेल्या माहितीनुसार, सरकार इंधनाचे दर ठरवत नाही आणि तेल कंपन्या सर्व आर्थिक पैलूंचा विचार करून निर्णय घेतात. तेल कंपन्या सांगत आहेत की, बाजारात अजूनही अस्थिरता आहे. त्यामुळं त्यांना या आधारावर निर्णय घ्यावा लागेल असे मत  हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केले.


महत्वाच्या बातम्या:


निवडणुकांच्या आधी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होणार का? खरं काय खोटं काय?