Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री आणि बीग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) या पाचव्यांदा राज्यसभेवर जात आहेत. त्या गेल्या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार होत्या. या पक्षातून पुन्हा त्यांनाच राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया बच्चन यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्या करोडो रुपयांच्या मालकीन आहेत. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
जया बच्चन आणि पती अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपयांची संपत्ती
4 वेळा राज्यसभा खासदार राहिलेल्या जया बच्चन यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या चल आणि स्थावर मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यानुसार पती अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांची एकूण संपत्ती 1578 कोटी रुपये आहे. जया बच्चन यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी समाजवादी पक्षाच्या उमेदवारी दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या चल आणि स्थावर मालमत्तेचा उल्लेख केला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय जया बच्चन आणि पती अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. यामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे. या कालावधीत जया बच्चन यांची कमाई 1,63,56,190 रुपये होती, तर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 273,74,96,590 रुपयांची भर घातली आहे.
खात्यात कोट्यावधी रुपये, पण विमा पॉलिसी नाही
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे 57,507 रुपये रोख आणि 10,11,33,172 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा आहेत. तर पती अमिताभ बच्चन यांच्याकडे 12,75,446 रुपये रोख आणि 120,45,62,083 रुपये बँक ठेव आहेत. जया बच्चन यांनी केलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे तर त्यांनी शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये 5,18,57,928 रुपये गुंतवले आहेत, तर अमिताभ बच्चन यांची यामध्ये 182,42,29,464 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रतिज्ञापत्र पाहिल्यास बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवला नाही.
40 कोटींहून अधिक किमतीचे दागिने
अभिनेत्री आणि चार वेळा राज्यसभा सदस्य राहिलेल्या जया बच्चन यांच्याकडे 9 लाख रुपयांची वाहने आहेत. तर अमिताभ यांच्या कारचे कलेक्शन सुमारे 17 कोटी रुपये आहे. ज्वेलरीबद्दल बोलायचे झाले तर जया बच्चन यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने आहेत. तर त्यांच्या पतीच्या मालकीचे दागिने 54 कोटी रुपयांचे आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण संपत्तीपैकी या जोडप्याकडे 849.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर दोघांकडे 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
दोघांकडेही करोडो रुपयांची घरे आणि जमीन
बच्चन कुटुंबाच्या लक्झरी जीवनशैलीचा अंदाज त्यांच्या संपत्तीवरून सहज लावता येतो. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान मिळवले आहे. दोघांच्या संपत्तीच्या स्त्रोतांबद्दल बोलताना जया बच्चन यांच्या संपत्तीत खासदारांचा पगार आणि अभिनयातून मिळणाऱ्या कमाईचा समावेश आहे. तर अमिताभ बच्चन चित्रपट, व्याज, भाडे, लाभांश, भांडवली नफा आणि सोलर प्लांटमधून उत्पन्न मिळवतात. या दोघांकडेही करोडो रुपयांची घरे आणि जमीन आहे.
महत्वाच्या बातम्या: