मुंबई : पर्सनल लोनला (Personal Loan) इमर्जन्सी लोन म्हटलं जातं. जेव्हा पैशांची फारच गरज असते, तेव्हा अनेकजण या कर्जाचा पर्याय निवडतात. फारशी कागदपत्रं न जमा करता, बँका, वित्तीय संस्था हे कर्ज देतात. तुमचे सिबील स्कोअर, उत्पन्न याचा विचार करून वैयक्तिक कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे या प्रकारचे कर्ज देताना कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. मात्र वैयक्तिक कर्ज अगदी सहज मिळत असले तरी फारशी गरज असेल तरच ते घेतले पाहिजे. काही कारणांसाठी तुम्ही कर्ज घेतल्यात तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.   


थकबाकी देण्यासाठी कर्ज काढू नका


तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील, तर ते परत करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेऊ नये. तसे केल्यास तुम्ही लोकांकडून घेतलेल कर्जाची परतफेड कराल, मात्र त्याच वेळी तुम्ही पर्सनल लोणच्या विळख्यात अडकू शकता. पर्सनल लोनचे तुम्हाला प्रत्येक महिन्याला हफ्ते भरावे लागतात. त्यामुळे तुमची आर्थिक अडचण वाढू शकते. परिणामी तुम्ही संकटात सापडू शकता. 


शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कर्ज काढू नये 


तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही कर्ज काढत असाल तर ही चूक टाळली पाहिजे. शेअर बाजार हा जोखमीच्या अधीन असतो. जागतिक घडामोडी, राज्यातील राजकीय घडामोडी, आर्थिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी याचा शेअर बाजारावर परिणाम पडतो. त्यामुळे एका क्षणात तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य वाढते तर कधी क्षणात ते मूल्य कमी होते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन काढू नये. कारण शेअर बाजारात दुर्दैवाने पैसे बुडाले तरी तुमच्या पर्सनल लोनचा हफ्ता कमी होत नाही. पर्सनल लोनवर तुम्हाला व्याजही द्यावे लागते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पर्सनल लोन काढू नये.   


आवड पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन काढू नये


तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन कधीच काढू नये. अनेकजण दागिने करण्यासाठी, महागडा मोबाईल घेण्यासाठी पर्सनल लोन काढतात. मात्र पर्सनल लोन काढून या आवडी पूर्ण करू नयेत. घरातील खर्च लक्षात घेऊनच आवडी पूर्ण केल्या पाहिजेच. तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठी तुम्ही पर्सनल लोनची मदत घेत असाल तर भविष्यात तुम्ही आणखी अडचणीत येऊ शकता. 


पर्सनल लोन नेमके कधी घ्यावे? 


तुम्हाला पैशांची फारच गरज असेल किंवा पैशाचे सर्व पर्याय बंद झाले असतील तरच पर्सनल लोन घ्यावे. पैशांचे सर्व स्त्रोत बंद झाले तरी पर्सनल लोन घेताना एकदा विचार केला पाहिजे. पर्सनल लोन सहज मिळेल, पण या लोनचे ईएमआय भरण्यास आपण सक्षम आहोत का? भविष्यात या अडचणी निर्माण होतील का? या प्रश्नांचा अगोदर विचार करायला हवा. त्यानंतर सारासार विचार करूनच तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करायला हवा. 


हेही वाचा :


शेअर बाजारावर 'हा' शेअर करणार कमाल? गुंतवणूक केल्यास तीन दिवसांत होणार छप्परफाड कमाई?


पीएफ खात्याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, जाणून घ्या नेमका काय बदल होणार?