Vegetable Prices : सध्या भाजीपाल्यांच्या दरात (Vegetable Prices) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळं एकीकडं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर दुसरीकडं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. देशातील काही शहरांमध्ये लसणाची किंमत 300 रुपये किलो आहे. तर आल्याची किंमत 200 रुपये किलोपेक्षा जास्त आहे.  


देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आजपासून तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरु झाली आहे. देशासाठीचे केंद्रीय धोरण दर आणि बँकांचे व्याजदर ठरवण्यासाठी RBI चे दर दोन महिन्यांनी ही पतधोरण बैठक आयोजित केली आहे. देशातील महागाईची स्थिती लक्षात घेऊन व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. दरम्यान, येत्या 8 डिसेंबरला पतधोरणासाठी, आरबीआय दरांमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असा अंदाज बहुतांश आर्थिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गेल्या महिन्यात देशातील किरकोळ आणि घाऊक महागाईचे दर चांगले असल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना दर वाढवण्याची गरज भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


वाढत्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशावर ताण


देशातील किरकोळ बाजारात भाज्यांच्या वाढत्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशावर विपरीत परिणाम होत आहे. कोलकात्याचे उदाहरण घेतले तर किरकोळ बाजारात टोमॅटो 60 रुपये किलो दराने विकला जात आहे. हिवाळ्यातील आवडती भाजी वाटाण्याच्या दरातही मोठी वाढ होत आहे. वाटाणा 100 रुपये किलोच्या आसपास आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचा सरासरी दर 60 रुपये किलो आहे.


सर्वच भाज्यांचे सरासरी दरात 15 ते 20 रुपयांची वाढ


पश्चिम बंगाल सरकारच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, जवळपास सर्वच भाज्यांचे सरासरी दरात 15 ते 20 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. टोमॅटो, वाटाणा आणि कांद्याच्या किंमती दुर्गापूजा आणि काली पूजेच्या सणासुदीच्या तुलनेत किंचित कमी झाल्याचा अंदाज सदस्यांनी व्यक्त केला आहे. परंतू, सध्याच्या किंमती सामान्य दरांपेक्षा जास्त आहेत. लसूण आणि आल्याच्या बाबतीतही असेच आहे. किरकोळ बाजारातील जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या टास्क फोर्स या संस्थेने ही माहिती दिली आहे.


कोलकात्यात लसणाची किंमत 300 रुपये किलो


कोलकात्यात लसणाची किंमत 300 रुपये किलो आहे. तर आल्याची किंमत 200 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. आले आणि लसणाच्या गगनाला भिडलेल्या किमती सामान्य जनता आणि सरकार दोघांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. हे दोन्ही पदार्थ बंगाली पदार्थांसाठी आवश्यक घटक आहेत.


भाज्यांचे भाव वाढण्याचे कारण काय? 


टास्क फोर्सच्या सदस्यांना वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोलकाताच्या किरकोळ बाजारात सामान्यत: जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किंमती अजूनही उच्च आहेत. कारण राज्यात पुरेशा प्रमाणात या भाज्या तयार होत नाहीत. टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की, या उत्पादनांना इतर राज्यांच्या पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असल्यानं जेव्हा जेव्हा पुरवठ्यात कमतरता असते तेव्हा त्यांच्या किमती वाढतात.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : पठ्ठ्याचा नादच खुळा! ऑडीतून विकतोय भाजीपाला, व्हिडीओ व्हायरल