US Recession : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीत अडकण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतूनच तसे संकेत मिळत आहे.अमेरिकेतील महागाईचा दर वाढला असून मध्यवर्ती बँकेने व्याज दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये 2022 मधील तिमाहीत घसरण झाली आहे. त्यामुळे बायडन प्रशासनासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 


अमेरिकन शेअर बाजारासाठी एप्रिलचा महिनादेखील निराशाजनक राहिला. नॅसडॅक निर्देशांकासाठी एप्रिलचा महिना हा ऑक्टोबर 2008 नंतरचा सर्वाधिक वाईट महिना ठरला. S&P साठीदेखील एप्रिल महिना मार्च महिना 2020 नंतरचा सर्वात वाईट महिना ठरला. यामुळे अमेरिकेत मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते सध्या अमेरिकेत मंदी येण्याचे संकेत दिसत आहेत.


गुगलवर अमेरिकेत एप्रिल महिन्यात आर्थिक मंदीबाबत सर्वाधिक माहिती शोधण्यात आली. सलग दोन तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेत घसरण दिसत असेल तर मंदी येत असल्याचे लक्षण समजले जाते. जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत आर्थिक मंदी आल्यास त्याचा परिणाम जगावर होण्याची भीती आहे. वर्ष 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स बँकेच्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेत मंदी आली होती. त्यानंतर मार्च 2020 मध्ये कोरोना महासाथीने जगभरातील शेअर बाजार कोसळले होते.


काही अर्थतज्ज्ञांनी अमेरिकेला आर्थिक मंदीचा इतक्यात धोका नसल्याचे म्हटले आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, Pantheon Macroeconomics research group चे मुख्य अर्थतज्ज्ञ इयान शेफर्डसन यांनी सांगितले की, जीडीपीमधील घसरण ही तात्पुरत्या स्वरुपातील असून मंदीचे संकट नाही. तर, Comerica Bankच्या मुख्य आर्थिक तज्ज्ञ बिल एडम्स यांनी म्हटले की, गुंतवणूक, रोजगारात वाढ आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवरील खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे सकारात्मक चित्र दिसत आहे. 


तर, दुसरीकडे आयएनजी या वित्तीय सेवेचे मुख्य आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ जेम्स नाइटली यांनी म्हटले की, वाढत्या महागाईमुळे  जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येत आहे. तर, दुसरीकडे महागाईच्या अनुषगांने पगार वाढला नाही. 


अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला असून ही स्थिती आणखी काही काळ राहू शकते. महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याज दरात वाढ करू शकते. अमेरिकेत येत्या काळात बेरोजगारीतही वाढ होणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला.