Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (23 जुलै) केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. यासह तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करू शकते. याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन लाडकी बहीण योजनेबाबत (Ladli Behna Scheme) महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्राकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा?
सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वांत अगोदर ही योजना मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती. याच योजनेच्या जोरावर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले. मध्य प्रदेशच्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना राबवली जात आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारतर्फेही लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लखपती दीदी योजनेबाबतही घोषणा होण्याची शक्यता
या योजनेसह केंद्र सरकार लखपती दीदी या योजनेसंदर्भातही काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सोबतच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे भरीवर आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. आंगणवाडी तसेच पोषण कार्यक्रमासाठी सरकार अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीही होणार घोषणा?
केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे यावेळची सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची शक्यता आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तीलादेखील या योजनेचा फायदा देण्याची तरतूद सरकारतर्फे केली जाऊ शकते. तशी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Union Budget 2024 Live Updates : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? कोणत्या घोषणा होणार?