IPO this week: भारतीय शेअर बाजारात सध्या चढउतार पाहायला मिळत आहेत. असे असले तरी गेल्या काही महिन्यांत आलेल्या बहुसंख्य आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या आठवड्यातही अनेक आयपीओ येणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. या आठवड्यात (21 ते 25 ऑक्टोबर) एकूण 10,985 कोटी रुपयांचे आयपीओ येणार आहेत. यासह ह्युंदाई मोटर्स या मोठ्या आयपीओसह अन्य तीन आयपीओंची शेअर बाजारावर लिस्टिंग होणार आहे.  


ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ एकूण 27,870 कोटी रुपयांचा होता. या आयपीओची लिस्टिंग 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सोबतच एसएमई श्रेणीतील लक्ष्य पॉवरटेक आणि फ्रएशरा अॅग्रो एक्सपोर्टर्स या कंपन्या शेअर बाजारावर 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होतील. 


वारी एनर्जीजचा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी आला


वारी एनर्जीजचा आयपीओ हा 21 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 1,427-1,503 रुपये प्रति शेअर आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 4,321 कोटी रुपये उभे करणार आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येईल.  या आयपीओत एकूण 3,600 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स असतील तर 721.44 कोटी रुपयांचे 48 लाख शेअर्स हे ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) च्या माध्यमातून विकण्यात येतील. 


दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा आयपीओ येणार 


या कंपनीने आयपीओ आणण्याआधी अँकर गुंतवणूकदारांकडून 18 ऑक्टोबर रोजी 1,277 कोटी रुपये उभे केले आहेत.  प्रीमियर एनर्जीज आणि वेबसोल एनर्जी यासारख्या बड्या कंपन्या या कंपनीच्या प्रतिस्पर्धी आहेत. दीपक बिल्डर्स अँड इंजीनिअर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 260 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओत एकूण 217 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 42.83 कोटी रुपयांचे ओएफएस शेअर्स असतील. 


गोदावरी बायोरिफायनरीज या कंपनीचा आयपीओ येणार


गोदावरी बायोरिफायनरीज या कंपनीच्या आयपीओत 23 ते 25 ऑक्टोबर या काळात गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून गोदावरी बायोरिफायनरीज ही कंपनी एकूण 555 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओत 325 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स असतील. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 65.26 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. या कंपनीच्या शेअर्सचा किंमत पट्टा 334 ते 352 रुपये प्रति शेअर आहे. 


शापूरजी पालोनजी ग्रुपचा आयपीओ येणार


शापूरजी पालोनजी ग्रुपचा एक महत्त्वाचा आयपीओ याच आठवड्यात येणार आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 25 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. ही कंपनी आयपीओतून 5,430 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओच्या प्राईस बँडची घोषणा 21 रोजी होणार आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार?


'हा' पीएसयू स्टॉक लय भारी! तीन दिवसांत तुम्हाला करणार मालामाल? एका वर्षात दिले 150 टक्क्यांनी रिटर्न्स