गेल्या अनेक दिवसांपासून अब्जाधीश एलॉन मस्क यांची भारतात चर्चा होत आहे. ते येत्या 22 एप्रिल रोजी भारतात येणार आहेत. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपल्या टेस्ला या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीला भारतात कसे आणता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, आता मस्क फक्त टेस्लाच नव्हे तर मस्क भारतातील अवकाश संशोधन क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


एलॉन मस्क भारतातील स्पेस स्टार्टअप्सशी बातचित करणार


एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीकडून कारनिर्मिती केली जाते. या कंपनीचा कारखाना भारतात उभा करण्याचा विचार मस्क यांच्याकडून केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून ते येत्या 22 एप्रिल रोजी भारतात येणार आहेत. येथे ते नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. टेस्ला कंपनी भारतात कशी आणता येईल, त्यासाठी काय-काय करता येईल, यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र आताते फक्त टेस्लाच नव्हे तर त्यांच्या स्पेस-एक्स या दुसऱ्या कंपनीलाही भारतात आणण्यावर विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. एलॉन मस्क आपल्या भारत दौऱ्यादरम्यान भारतातील स्पेस स्टार्टअप्स संस्थापकांची भेट घेणार आहेत. भारत दशास स्पेस टेक्नोलॉजीमध्ये काय-काय केलं जातंय, हे मस्क जाणून घेणार आहेत. याच कारणामुळे मस्क भविष्यात भारतात अवकाश संशोधन क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


अनेक स्टार्टअप्सना आमंत्रण 


मनी कन्ट्रोल या संकेतस्थळानुसार  मस्क याच्या भारत दौऱ्यादरम्यान अवकाश संशोधनात काम करणाऱ्या अनेक संस्थांना भारत सरकारने आमंत्रित केले आहे. यात स्कायरूट एअरोस्पेस, ध्रुव स्पेस (Dhruva Space), पियर साइट (Piersight), दिगंतारा (Digantara) या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आले आहे. मस्क या सर्व स्टार्टअप्सशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, या बैठकीचे नेमके स्वरुप समजू शकलेले नाही. मात्र मस्क भारतात अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात काय काम चालू आहे, हे जाणून घेणार आहेत. 


जेफ बेझोस हेदेखील करणार गुंतवणूक?


गेल्या काही वर्षांपासून भारतील अवकाश संशोधनाकडे संपूर्ण देश उत्सुकतेने पाहतोय. भारतात काय चालू आहे. कशावर काम चालू आहे, हे इतर देश जाणून घेत आहेत. अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि स्पेस टेक कंपनी ब्लू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस हेदेखील भारतात चालू असलेल्या अवकाश संशोधाबाबत उत्सुक आहेत. त्यांनीदेखील भारतातील अनेक स्पेस स्टार्टअप्स आणि भारत सरकार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


दरम्यान, आता मस्क भारतातील स्पेस स्टार्टअप्सशी बातचित करणार असल्यामुळे आगामी काळात त्यांची स्पेस एक्स ही कंपनीदेखील भारतात गुंतवणूक करणार का? असे विचारले जात आहे. 


हेही वाचा :