Bloomberg Billionaires Index: स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. 49 वर्षीय इलॉन मस्क यांची संपत्ती 7.2 अब्ज डॉलर्सवरुन 127.9 अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक उद्योगधंदे मंदीत गेले असताना टेस्लाच्या शेअर्स किंमतीत वाढ झाल्याने त्यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते.
या वर्षी संपत्तीत 100.3 अब्ज डॉलर्सची भर
इलॉन मस्क यांच्यासाठी हे वर्ष भरभराटीचे ठरले आहे. कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था मंदीत असताना इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला मोठा फायदा झाल्याचे पहायला मिळते. या एकाच वर्षी त्यांच्या संपत्तीत तब्बल 100.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या एका अहवालानुसार जानेवारी महिन्यात इलॉन मस्क हे श्रीमंतांच्या यादीत 35 व्या स्थानी होते. आता ते दुसऱ्या स्थानी आले आहेत. या यादीत 183 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. तर 127.9 अब्ज डॉलर्स संपत्तीसह इलॉन मस्क आता दुसऱ्या स्थानी आले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. त्यांची संपत्ती 127.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तसेच 105 अब्ज डॉलर संपत्तीसह बर्नार्ड अर्नाल्ड हे चौथ्या स्थानी आहेत तर 102 अब्ज डॉलर्स संपत्तीसह फेसबुकचे मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला होता.
एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स हे आता तिसऱ्या स्थानी आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी 2017 साली बिल गेट्स यांना पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर ढकलले. बिल गेट्स हे त्यांच्या संपत्तीतील मोठा वाटा मानवतावादी कार्यात खर्च करतात. 2006 पासून त्यांनी 27 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती दान केली आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सकडून जगातील 500 सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार या वर्षी जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 67.7 अब्ज डॉलर्स, इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 110.3 अब्ज डॉलर्स तर बिल गेट्स यांच्या संपत्तीत 14.5 अब्ज डॉलर्स इतकी भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या: