Income Tax Return : आयकर परतावा भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उत्पन्न दाखवून त्यावर कर भरण्याची ही वेळ आहे. लोकांचे उत्पन्न अनेक प्रकारे असते. लोकांच्या उत्पनाचे विविध प्रकार असतात. काही लोक देशात राहून कमावतात तर काही परदेशात नोकरी करून पैसे कमवतात. बरेच लोक असे आहेत जे काही काळ भारतात काम करतात आणि चांगली ऑफर मिळाल्यावर परदेशात जातात. त्यांच्यासमोर एक पेच आहे की, आयकर भरावा की नाही, भरायचाच असेल तर भरायचा कसा, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.


करदात्यांनो, येथे लक्ष द्या!


तुम्ही आर्थिक वर्षात 182 दिवस भारतात राहिल्यास, तुम्हाला येथील निवासी समजलं जातं. भारतीयाचे रहिवासी जागतिक उत्पन्न म्हणजे जगभरातील उत्पन्न कराच्या कक्षेत येते. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, तर तुमची कमाई देशात आणि परदेशात करपात्र असेल. भारतात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला लागू असलेले समान आयकर दर तु्म्हालाही लागू होतील.


आयकर परतावा भरताना 'ही' खात्री करा


या संदर्भात आयकर विभागाने पुन्हा सर्व करदात्यांना सतर्क केले आहे. प्राप्तिकर विभागाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ज्या करदात्यांकडे देशाबाहेरील बँक खातं आहे किंवा इतर कोणतीही मालमत्ता किंवा उत्पन्न आहे, त्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरताना परदेशी मालमत्ता शेड्यूल (Foreign Asset Schedule) भरणं आवश्यक आहे. आयकर परतावा भरताना करदात्यांनी त्यांच्या सर्व परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत नमूद केले आहेत, याची खात्री करावी.


...नाहीतर येईल आयकर विभागाची नोटीस


देशात कपात आणि सूट उपलब्ध असल्यास, कर सूट मिळू शकते. जर तुम्ही 80C किंवा 80D अंतर्गत कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्ही कर सूट घेऊ शकता. तुम्ही येथे परदेशात मिळालेल्या सवलतीचा वापर करू शकणार नाही. परदेशात कमाई केल्यावर, तुम्हाला आयकर रिटर्नमध्ये एफए म्हणजेच विदेशी मालमत्तेची माहिती द्यावी लागेल. परदेशात तुमची कोणतीही मालमत्ता किंवा बँक खाते असल्यास त्याची योग्य माहिती आयकर विभागाला द्या. असं न केल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते.






'ही' चूक केल्यास भरावा लागेल 10 लाखांचा दंड


करदात्याला सर्व उत्पन्नाचा उल्लेख केला नसेल तर आयकर विभाग त्याच्यावर कारवाई करू शकतो. या प्रकरणांमध्ये काळा पैसा म्हणजे अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता (Undisclosed Foreign Income and Assets) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. आयकर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे, त्यामुळे लवकरात लवकर प्राप्तिकर परतावा दाखल करा.


टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकता


आयकर परतावा भरताना परदेशात मिळणारा पगार Income From Salary Head या उत्पन्नात दाखवावा लागतो. तुम्हाला परकीय चलनात मिळणारा पगार रुपयात रूपांतरित करावा लागेल. नोकरीवर ठेवणाऱ्या मालकाचा किंवा कंपनीचा तपशील द्यावा लागेल. जर या पगारावर कोणत्याही प्रकारचा कर कापला गेला असेल, तर तुम्ही रिटर्नमध्ये दाखवून टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकता. दुहेरी कर टाळण्याचा DTAA कराराचा लाभ घेऊन तुम्ही दुहेरी कर टाळू शकता. तुम्ही काम करत असलेल्या देशासोबत DTAA नसेल तर कलम 91 अंतर्गत दिलासा मिळू शकतो.