Tata Consumer To Acquire Chings Secret Capital Foods And Organic India: मुंबई : रतन टाटा (Ratan Tata) यांच्या टाटा समूहाच्या (Tata Group) साम्राज्यात आता आणखी दोन कंपन्या जोडल्या जाणार आहेत. कारण टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनं (Tata Consumer Products Ltd) आपला व्यवसाय मजबूत करण्यासाठी कॅपिटल फूड्स (Capital Foods) आणि फॅब इंडिया (Fab India) खरेदी करणार आहे. यासाठी टाटा समूहानं दोन्ही कंपन्यांशी करार केला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही कंपन्या टाटा समूहाच्या पंखाखाली येतील, अशी माहिती मिळत आहे. 


टाटा कंज्युमर (Tata Consumer) नं घोषणा केली आहे की, ते ''चिंग्स सीक्रेट' (Ching's Secret) आणि 'स्मिथ अँड जोन्स' (Smith & Jones) सारख्या ब्रँडचे मालक असलेल्या कॅपिटल फूड्स (Capital Foods) कंपनीला 5 हजार100 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. टाटा कंझ्युमर त्‍यामध्‍ये 100 टक्‍के स्‍टेक खरेदी करेल, त्‍यासाठी करार झाला आहे. याशिवाय फॅबइंडिया ऑरगॅनिक इंडिया (Organic India) ब्रँडची कंपनी 1 हजार 900 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. ही कंपनी पॅक केलेला ऑरगॅनिक चहा, हर्बल उत्पादनं आणि इतर आरोग्याशी संबंधित उत्पादनं विकते.


काय-काय विकतं कॅपिटल फूड्स? 


टाटा कंज्युमरनं कॅपिटल फूड्स (Capital Foods) खरेदी करण्याबाबत म्हटलं आहे की, 75 टक्के इक्विटी शेयरहोल्डिंग आधीच घेतली जाईल आणि इतर 25 टक्के शेयरहोल्डिंग पुढच्या तीन वर्षांत घेतली जाईल. ही कंपनी चिंग्स सीक्रेट (Ching's Secret) ब्रँडच्या नावानं चटणी, मसाला, न्यूडल्सपासून इंस्टंट सूपही विकते. याव्यतिरिक्त ही कंपनी स्मिथ अँड जोन्स ब्रँड कंपनी इटालियन आणि इतर पाश्चात्य पदार्थ घरच्या घरी झटपट तयार करण्यासाठी उपलब्ध करुन देते. 


टाटा ग्रुप का खरेदी करतेय 'ही' कंपनी? 


बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायाला नवा दर्जा देण्यासाठी कॅपिटल फूड्सचं अधिग्रहण करण्यात येत असल्याचं टाटा समूहानं सांगितलं आहे. Tata Consumer नं सांगितलं की, FY2024 साठी कॅपिटल फूड्सची अंदाजे उलाढाल सुमारे 750 ते 770 कोटी रुपये आहे, तर ऑरगॅनिक इंडियाची FY2024 साठी अंदाजे उलाढाल सुमारे 360 ते 370 कोटी रुपये आहे.


दोन्ही कंपन्यांशी 7 हजार कोटी रुपयांचा करार 


टाटा कंपनी दोन्ही कंपन्यांना 7 हजार कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो, असं टाटा कंझ्युमरनं म्हटलं आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक अजय गुप्ता म्हणाले की, आम्ही टाटा समूहाशी संलग्न होण्यास उत्सुक आहोत. या दिवसाचं ऐतिहासिक दिवस म्हणूनही त्यांनी वर्णन केलं आहे. तर फॅब इंडियाचे एमडी विल्यम बिसेल म्हणाले की, टाटा समूह सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळापासून आहे. अशा परिस्थितीत आम्हीही त्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहोत. दरम्यान, शुक्रवारी, टाटा कंझ्युमर शेअर्स 3.5 टक्क्यांनी वाढून 1,158.7 रुपयांवर व्यवहार करत होते.