Adani Group News Update चेन्नई : गौतम अडानी (Gautam Adani) यांच्या अदानी एनर्जी सोल्यूशन्स या कंपनीसाठी आज एक वाईट बातमी समोर आली. कारण, तामिळनाडूच्या द्रमुक सरकारनं राज्यात लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भातील ग्लोबल टेंडर रद्द केलं आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये अदानी एनर्जी सोल्यूशन्सनं सर्वात कमी दरानं बोली लावली होती. तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशननं हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
टेंडर रद्द करण्याचं कारण काय?
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशननं स्मार्ट मीटरचं टेंडर रद्द केलं आहे. टेंडर रद्द करताना त्यांनी अदानी एनर्जी सोल्यूशन्सनं अधिक खर्चाचा उल्लेख केला आहे, असं म्हटलं. अदानी एनर्जी सोल्यूशन्स चेन्नई, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू यासह चार जिल्ह्यांना कवर करणाऱ्या चार पॅकेजपैकी एका पॅकेजमध्ये सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की अदानी एनर्जी सोल्यूशन्सनं प्रकल्प टेंडर मिळवण्यासाठी जो खर्च दाखवला आहे तो राज्य सरकारला कदापि मान्य नाही. मात्र, कमी खर्चात काम करण्यासांदर्भात यापूर्वी कंपनीशी चर्चा झाली होती.
नव्यानं टेंडर काढणार
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की प्रस्तावित पॅकेजमध्ये केंद्राकडून पुनर्विकसित वितरण क्षेत्र योजनेनुसार 19000 कोटी रुपये निधी मिळणार असून त्याद्वारे 82 लाख मीटर लावण्याचा प्रस्ताव आहे. या प्रोजेक्टनुसार कृषी पंपासाठीची वीज कनेक्शन सोडून इतर सर्व वीज कनेक्शनसाठी स्मार्ट मीटर लावण्याचा प्रस्ताव आहे. तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी म्हटलं की ऑगस्ट 2023 मध्ये चार टेंडर रद्द करण्यात आली आहेत. ज्यामध्ये तीन पॅकेजचा समावेश आहे, जे दुसरा जिल्ह्यामध्ये येतात. सरकार लवकरच नव्यानं टेंडर जारी करेल. यापूर्वी स्टॅलिन सरकारवर अदानी समुहाला फायदा पोहोचवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत होतं.
दरम्यान, अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअरमध्ये आज नाममात्र घसरण पाहायला मिळाली. आज या कंपनीचा शेअर 0.95 पैशांनी घसरुन 805.25 रुपयांवर पोहोचला आहे.
इतर बातम्या :