नवी दिल्ली : बंगळुरुस्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीने ((Swiggy) आपले नोंदणीकृत नाव बदलले आहे. स्विगीचे त्याचे Bundl Technologies Pvt Ltd हे नाव भागधारकांच्या एका विशेष बैठकीत मंजुरी घेऊन Swiggy Pvt Ltd असं केलं आहे. स्विगी आपला आयपीओ (IPO) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने नाव बदलल्याची माहिती समोर येत आहे. 


बंगळुरुस्थित कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला नाव बदलण्यासाठी आरओसीकडून मंजुरी मिळाली होती. वास्तविक स्विगी आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.  एका अहवालानुसार स्वीगीच्या आयपीओ 100 कोटी डॉलर्सपर्यंत असू शकतो. स्विगीचा प्रतिस्पर्धी झोमॅटोने 2021 साली शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून स्विगीने आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखली आहे. 


आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत (Swiggy IPO)


स्विगीने नोंदणीकृत नाव बदलण्याचे एक कारण म्हणजे आयपीओ लॉन्च करणे. नाव बदलल्याने स्विगीला कॉर्पोरेट नाव ओळखण्यास मदत होईल. स्विगी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयपीओसाठी ड्राफ्ट दाखल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट त्याच्या खर्चात कपात करून चांगला नफा मिळवणे आहे. स्विगी भविष्यात आपला नफा वाढवण्यासाठी आणखी काही पावले उचलू शकते.


मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात स्विगीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक 45 टक्क्यांनी वाढून 8,265 कोटी रुपये झाला आहे. असं असलं तरी या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 15 टक्क्यांनी वाढून 4,179 कोटी रुपये झाला आहे. फूड डिलिव्हरी व्यतिरिक्त कंपनी स्विगी इंस्टामार्ट ब्रँड अंतर्गत किराणा सामान वितरीत करते.


नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मॅजेती यांनी 2014 मध्ये  Bundl Technologies Pvt Ltd ची स्थापना केली. सध्या श्रीहर्ष मॅजेती हे फर्मचे सीईओ आहेत.  


ही बातमी वाचा: