नवी दिल्ली : केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना मुलींचं भविष्य सुरक्षित करणारी विश्वासार्ह सरकारी योजना मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या व्याज, मॅच्युरिटी रकमेची गॅरंटी असते.
आई वडील या योजनेद्वारे मुलीचं शिक्षण, करिअर आणि लग्नासाठी पहिल्यापासून आर्थिक नियोजन करु शकतात. या योजनेत फक्त चांगले रिटर्न मिळत नाहीत. तर, कर सवलत मिळते. जाणून घेऊयात 2000 रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवण्यास सुरु केल्यास किती रक्कम मिळू शकते.
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळतं?
सुकन्या समृद्धी योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या नावावर खातं उघडता येतं. वार्षिक आधारावर किमान 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक 15 वर्षांपर्यंत करता येते. मात्र खातं 21 वर्षांपर्यंत सुरु राहतं. म्हणजेच अखेरच्या 6 वर्षात तुम्हाला गुंतवणूक करावी लागत नाहीत, व्याज वाढत राहतं.
केंद्र सरकारकडून या योजनेसाठी वार्षिक 8.2 टक्के व्याज दिलं जातं. केंद्र सरकार दर तिमाहीत व्याज जमा करतं. यातील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. एखादा पालक सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावे दर महा 2000 रुपये जमा करत असेल तर वार्षिक गुंतवणूक 24000 रुपये होईल. म्हणजे 15 वर्षात 3.6 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
2000 रुपये दरमहा गुंतवणुकीनं 15 वर्षातील गुंतवणूक 3 लाख 60 हजार रुपयांची होईल. त्यावर 8.2 टक्के व्याज आणि कम्पाऊंडिंगच्या सरकारी नियमानुसार 15 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 9 लाख 60 हजार ते 10 लाख रुपयांची रक्कम मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेत 16 ते 21 वर्ष या 6 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूक करावी लागत नाही. पहिल्यापासून जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळत जातं. म्हणजेच 3.6 लाखांच्या गुंतवणुकीवर तिप्पट रक्कम मिळते.
एखाद्या पालकानं 1000 रुपयांच्या हिशोबानं गुंतवणूक सुकन्या समृद्धी योजनेत केल्यास त्याला 21 वर्षानंतर 4.8 ते 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळेल. 3000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना 14.5 ते 15 लाख रुपये 21 वर्षानंतर मिळतील. 4000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 19 ते 20 लाख रुपये पालकांना मिळतील. तर, 5000 रुपये दरमहा सुकन्या समृद्धी योजनेत टाकल्यास 21 वर्षानंतर 24 ते 25 लाख रुपये मिळू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडल्यानंतर पूर्ण रक्कम 21 वर्षानंतर मिळते. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास त्यासाठी जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळू शकते.
सुकन्या समृद्धी योजना पूर्णपणे सरकारी गॅरंटी असलेली योजना आहे. यामध्ये जोखीम नाही. याचा व्याज दर मुदत ठेव किंवा इतर बचत योजनांपेक्षा अधिक आहे. करसवलत आणि टॅक्स फ्री मॅच्युरिटी मुळं ही योजना आकर्षक आहे.