Share Market मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा दिवसांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सातव्या दिवशी शेअर बाजारात तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती. दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी नफा वसुली साठ विक्री सुरु केल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली होती. दुपारी बाजार बंद होईपर्यंत काही अकांनी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. सेन्सेक्समध्ये 33 अकांची तर निफ्टी 50 निर्देशांक केवळ 10 अकांनी वाढला.
निफ्टी 50 निर्देशांक आज 23668.65 अंकांवर बंद झाला. आज केवळ 10.30 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे सेन्सेक्स 32.80 अंकांनी वाढला, सेन्सेक्स 78017.19 अंकांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे साडेतीन लाख कोटी बुडाले
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 414.79 लाख कोटींवर आलं. 24 मार्च 2025 ला बाजार बंद झाला तेव्हा 418.29 लाख कोटींवर होता. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 3.50 लाख कोटींनी घटलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचे एका दिवसात साडे तीन लाख कोटी बुडाले.
आज कोणत्या शेअरमध्ये तेजी ?
बीएसईवरील 30 पैकी 10 शेअर तेजीसह बंद झाले. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, झोमॅटो, इंडसइंड, अदानी पोर्ट्स, महिंद्र अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली.
बीएसईवर लिस्ट असलेल्या शेअरपैकी घसरण होत असलेल्या शेअरची संख्या अधिक आहे. एक्सचेंजवरील 4177 पैकी 1085 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 2983 शेअरमध्ये घसरण झाली. तर 109 शेअरमध्ये कोणतीही घसरण झाली नाही. तर, 71 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.146 शेअरनी 52 आठवड्यांचा निचांक गाठला.
घसरणीचं नेमकं कारण काय?
भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात म्हणजेच 17 मार्च ते 21 मार्च या पाच दिवसांच्या काळात तेजी पाहायला मिळाली होती. साडे चार वर्षानंतर एका आठवड्यात सर्व दिवशी तेजी पाहायला मिळाली. सोमवारी म्हणजे काल 24 मार्चला देखील शेअर बाजारात तेजीचं चित्र होतं. आज शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी50 जरी काही अंकांनी वाढलेला असला तरी गुंतवणूकदारांचे साडेतीन लाख कोटी बुडाले.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)