Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nity) निर्देशांक वधारले. जागतिक शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. त्याच्या परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले होते. आज शेअर बाजाराची सुरुवात गॅप अपने झाली. 


शेअर बाजारात सेन्सेक्स 451.23 अंकांनी वधारत  56,267  खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 133.05 अंकांनी वधारत 16,774 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 515 अंकांनी वधारला असून 56,331.83 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टीत 137 अंकांची तेजी दिसत असून 16,778.95 अंकांवर व्यवहार करत आहे. 


निफ्टीतील 50 पैकी 38 शेअरमध्ये खरेदी सुरू असल्याने तेजी दिसून येत आहे. तर,  12 शेअर्सच्या दरात घसरण झाली आहे. बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी 418 अंकांनी वधारला असून  37200 अंकांचा टप्पा ओलांडला आहे.  


सेक्टोरियल इंडेक्समध्ये आज बँक, आयटी आणि वित्तीय सेवांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. 


बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक,  इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात मोठी वाढ झाली आहे. तर, विप्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेसह एशियन पेंट्सच्या शेअर दरात ही वाढ झाली आहे. 


एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, आयटीसी, भारती एअरटेल, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. 


दरम्यान, बुधवारी  शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 547.83 अंकांनी, तर निफ्टी निर्देशांक 158 अंकांनी वधारला होता. दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा सेन्सेक्स 55816.32 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 16641.80 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा 1714 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. तर, 1521 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 136 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.