Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची (Stock Market) सुरुवात आज संमिश्र पातळीवर झाली. सेन्सेक्स (Sensex) किंचित वाढीसह उघडला, तर निफ्टीनंही (Nifty) किंचित वाढ नोंदवली. ऑटो स्टॉक्समध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, आज बँक शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी 9.22 वाजता सेन्सेक्स 144.88 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत होता. दरम्यान, आरबीआयचे मौद्रीक धोरण, अमेरिकीतील बँकिंग व्यवस्थेतील बदल आणि संमिश्र जागतिक परिस्थितीचा परिणाम यामुळे शेअर बाजारात काहीशी अस्थिरता असल्याचं दिसून येत आहे. 


कशी झाली बाजाराची सुरुवात? 


NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी आज 24.25 अंकांच्या म्हणजेच, 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 17,422.30 वर उघडला. BSE चा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 11.73 अंकांच्या म्हणजेच, 0.02 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 59,094.71 वर उघडला.


सेन्सेक्स-निफ्टी शेअर्सची स्थिती काय? 


सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स तेजीत आहेत आणि केवळ 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, निफ्टीबाबत बोलायचं झालं तर 50 पैकी 26 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 24 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


सेक्टोरल इंडेक्सची परिस्थिती काय? 


निफ्टीच्या सेक्टोरल इंडेक्सवर नजर टाकली, तर ऑटो शेअर्समध्ये काल असलेली तेजी आज दिसत नाही. आयटी, मेटल, फार्मा, पीएसयू बँक आणि हेल्थकेअर इंडेक्स शेअर्स आज घसरणीसह लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. आर्थिक क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक 0.94 टक्के तेजी दिसून येत आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्स 0.56 टक्क्यांनी वधारले आहेत आणि रिअल्टी शेअर्समध्ये 0.60 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.


कोणते स्टॉक तेजीत? 


बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी घेऊन व्यवहार होत आहेत.


रुपयाची सुरुवात कशी होती? 


भारतीय रुपयानं आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जोरदार सुरुवात केली. रुपया 27 पैशांच्या वाढीसह उघडला. 82.33 च्या तुलनेत रुपया प्रति डॉलर 82.06 वर उघडला.