नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाचे तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट समोर आले आहेत. भारतीय स्टेट बँकेचा निव्वळ नफा 16891 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, तरी देखील गुरुवारी (6 फेब्रुवारी) आणि आज स्टेट बँकेचा शेअर घसरला आहे. काल स्टेट बँकेचा शेअर 753.95 रुपयांवर बंद झाला होता. आज देखील स्टेट बँकेच्या शेअरमध्ये 10 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. 


स्टेट बँकेनं ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 84 टक्क्यांची वाढ केली आहे. स्टेट बँकेनं या तिमाहीत 16891 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. तर, 2023-24 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेचा नफा 9164 कोटी रुपये होता. 


स्टेट बँकेचा व्याजातून मिळणारा नफा चार टक्क्यांनी वाढून 41446 कोटी रुपयांवर  पोहोचला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षात 39816 कोटी रुपयांवर होता. बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठीचा खर्च 17 टक्क्यांनी घटून 16074 कोटी रुपये झाला आहे. 


स्टेट बँकेच्या ठेवी 52.3 लाख कोटींवर 


स्टेट बँकेकडील ठेवींमध्ये तिसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे. स्टेट बँकेतील ठेवी 9.81 टक्क्यांनी वाढून 52.3 लाख कोटींवर गेल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत ठेवींची रक्कम 47.62 लाख कोटी रुपये होते. लक्ष्मीश्री इन्वेस्टमेंट अँड सिक्यूरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी म्हटलं की होल बँक आणि डोमेस्टिक एआयएम अनुक्रमे 3.01  टक्के आणि 3.15  इतकं आहे. 


स्टॉक्स बॉक्सचे संशोधन विश्लेषक अभिषेक पांड्या यांनी तिसऱ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत निव्वळ व्याज, उत्पन्न  आणि कमी वित्त पुरवठा दर स्थिर असून चांगली कामगिरी केली आहे.


स्टेट बँकेच्या शेअरमध्ये घसरण सुरु


स्टेट बँक ऑफ इंडियानं तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी करुन देखील सलग दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये घसरण सुरु आहे. आजच्या सत्रात देखील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत जवळपास 10 रुपयांनी शेअर घसरले आहेत. 


इतर बातम्या : 




(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)