Soil Test Center : अलिकडच्या काळात सरकार विविध व्यवसाय (Business) करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देते. तसेच आर्थिक पाठबळ (Financial support) देण्याचं काम देखील सरकारच्या (Govt) विविध योजनांच्या माध्यमातून केलं जातं. दरम्यान, तुम्हाला जर व्यवयासायात उतरायचे असेल तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुमच्या मनात असतो. तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. या व्यवसायासाठी सरकार 4.4 लाख रुपयांचे अनुदान देते. 


तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळवू शकता


गावत बसून तुम्ही माती परिक्षणाचा व्यवसाय सहज करु शकता. यासाठी तुम्हाला कठेही जाण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीचे परिक्षण करायचे आहे, तो शेतकरी तुम्हाला माती आणून देईल. त्यानंतर तुम्हाला परिक्षण केंद्रावर मातीची तपासणी करावी लागेल. यासाठी संबंधीत शेतकऱ्याला नमुन्यासाठी 300 रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळवू शकता. 


माती परीक्षण केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना 


दरम्यान, केंद्र सरकारने माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी सरकार मदत करते. या लॅबमध्ये पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. विशेष म्हणजे दोन प्रकारची माती परीक्षण केंद्रे आहेत. पहिली म्हणजे स्थावर माती परीक्षण प्रयोगशाळा, म्हणजे दुकान भाड्याने घेऊन माती परीक्षण केंद्र सुरू करू शकता. हे दुकान तुम्ही गावातही सुरू करू शकता. तर दुसरी मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या अंतर्गत, तुम्हाला एक वाहन खरेदी करावे लागेल, ज्यामध्ये माती परीक्षण केंद्राची सर्व उपकरणे ठेवता येतील. या वाहनाद्वारे तुम्ही गावोगावी जाऊन माती परीक्षण करून चांगला नफा मिळवू शकता. 


माती परिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी काय करावं लागेल?


नियमानुसार मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच मिनी माती परीक्षण केंद्रे उघडू शकतात. तसेच, लाभार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय त्याला कृषी चिकित्सालय आणि शेतीविषयी चांगले ज्ञान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि लघु माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन उपसंचालक किंवा सहसंचालकांना भेटावे लागेल.


आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं


माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी agricoop.nic.in वेबसाइट आणि soilhealth.dac.gov.in वर अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर देखील कॉल करू शकता. सर्व प्रथम कृषी अधिकारी तुम्हाला भरण्यासाठी एक फॉर्म देतील. तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती कृषी विभागाकडे जमा करावी लागतील.


सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत माती परीक्षण केंद्र उघडल्यास 75 टक्के अनुदान


दरम्यान, पंचायत स्तरावरील माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज आहे. पण सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत माती परीक्षण केंद्र उघडल्यास सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाईल. म्हणजे तुम्हाला सरकारकडून अनुदान म्हणून 3.75 लाख रुपये मिळतील. तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1.25 लाख रुपये खर्च करावे लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यासाठी तुमचे स्वतःचे किंवा भाड्याचे कायमस्वरूपी घर असणे आवश्यक आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


ऑफिस बॉय ते करोडपती, जनावरांच्या गोठ्यातच सुरु केली कंपनी, कसं घडलं शेतकऱ्याच्या मुलाचं आयुष्य?