Rs 2000 Note Exchange:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चलनातून 2000 रुपयांची (Rs 2000) नोट बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. या 2000 नोटा बदलण्याची प्रक्रिया उद्यापासून, 23 मेपासून सुरू होणार आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या 2000 रुपयांच्या नोटा सहजपणे बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म (Requisition Slip) भरण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही. तुम्ही एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलू शकता.


आरबीआयने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेच्या मार्फत बदलता येणार आहेत. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील अशांना नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 


SBI ने काय म्हटले?


आरबीआयने चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये ओळखपत्र आवश्यक असेल, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. अशा प्रकारच्या चर्चांवर  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या सर्व शाखांना कळवले आहे की, RBI ने गेल्या शुक्रवारी तात्काळ प्रभावाने चलनातून काढलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही फॉर्मची आणि कोणत्याही ओळखीच्या पुराव्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.  बँकेने 20 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या इतर मूल्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


2016 च्या नोट बंदीनंतर 2000 ची नोट चलनात आली


8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.


मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही 


2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 


2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली


दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती. 


इतर संबंधित बातमी: