SN Subrahmanyan नवी दिल्ली : एल अँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात 90 तास काम करायचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सिनेविश्वापासून ते उद्योग जगतातील दिग्गजांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनं देखील या प्रकरणात उडी घेत भाष्य केलं. एस.एन. सुब्रह्मण्यन ट्रोल होताच त्यांच्या कंपनीकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं.
नेमकं प्रकरण काय?
एस.एन. सुब्रह्मण्यन हे त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत होते. यावेळी त्यांनी एका आठवड्यात 90 तास काम करण्याचं समर्थन केलं. ते म्हणाले की मला खेद वाटतो की मी तुमच्याकडून रविवारी काम करुन घेऊ शकत नाहीत. जर मी तसं करु शकलो तर मला जास्त आनंद होईल, कारण मी स्वत: रविवारी काम करतो.
Reddit वर प्रसारित झालेल्या एका व्हायरल व्हिडिओत असं पाहायला मिळतं की एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात केवळ 90 तास करम्याचा सल्ला दिलेला नाही तर कर्मचाऱ्यांना म्हटलं की 'तुम्ही घरी थांबून पत्नीला किती वेळ पाहणार, घरी कमी कार्यालयात अधिक वेळ घालवा', यानंतर सोशल मीडियावरुन एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्यावर टीका सुरु झाली.
उद्योग जगतापासून सिनेविश्वातील व्यक्तींकडून टीका
एल अँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या 90 तासांच्या कामाच्या सल्ल्यावरुन वादाला सुरुवात झाली. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहेत. आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन अब्जाधीश हर्ष गोएंका यांनी देखील यावर टीका केली. हर्ष गोएंका यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं जाणार असेल नाव देखील बदललं पाहिजे. सनडे ला सन ड्युटी असं म्हटलं पाहिजे, असं म्हणत टीका केली.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं देखील एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या या प्रस्तावावर टीका केली. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टेसला स्टोरी ठेवत एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्यावर टीका केली.एवढ्या मोठ्या पदावर बसलेली ज्येष्ठ व्यक्ती अशी वक्तव्य करतात हे बघून धक्का बसला, मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं असतं, असं दीपिका म्हणाली.
एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्याकडून चीनचं उदाहरण
एल अँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला देताना चीनमधील एका व्यक्तीसोबतच्या चर्चेचा दाखला दिला. एस.एन. सुब्रह्मण्यन म्हणाले की चीनचा व्यक्ती म्हणाला ते अमेरिकेच्या पुढं जाऊ शकतात, कारण चीनचे कर्मचारी 90 तास काम करतात. अमेरिकेत दर आठवड्याला 50 तास काम केलं जातं. हे सांगत एस.एन. सुब्रह्मण्यन कर्मचाऱ्यांना म्हणाले की तुम्हाला जगात सर्वांच्या पुढं जायचं असल्यास तुम्हाला दर आठवडा 90 तास काम करावं लागेल, पुढे चला मित्रांनो...
कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या वर्क कल्चर संदर्भातील टिप्पणीवर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. एल अँड टीनं म्हटलं की राष्ट्र निर्माण हे आमच्या जनादेशाचं मूळ आहे. गेल्या 8 दशकांपासून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत, उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.आम्हाला वाटतं की हे दशक भारताचं आहे. विकास आणि पुढं जाण्यासाठी, देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एका सार्वत्रिक दृष्टिकोनाची आणि सामूहिक समर्पण, प्रयत्नांची आवश्यकता आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं की आमचे चेअरमन सुब्रह्मण्यम यांचं वक्तव्य या मोठ्या महत्त्वकांक्षेला दर्शवतं. आमची कंपनी यावर जोर देते की विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी विशिष्ट प्रयत्नांची गरज आहे. एल अँड टीमध्ये आम्ही अशा संस्कृतीला महत्त्व देतो, त्यासाठी कटिबद्ध आहोत,त्याचं उद्देशानं कामगिरी करत प्रदर्शन करत आम्ही पुढं जातोय.
दरम्यान, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी देखील यापूर्वी दर आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. त्याचं ते समर्थन करत राहिले. त्यांच्यावर देखील त्यावेळी जोरदार टीका झाली होती.
इतर बातम्या :