Share Market Updates : रशिया-युक्रेन युद्धामुळे गुरुवारी कोसळलेला शेअर बाजार आज शुक्रवारी चांगलाच वधारला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानादेखील आज सेन्सेक्स 876 अंकांनी गॅप अपने उघडला. तर निफ्टीतही 297 अंकांची उसळण दिसून आली.
रशिया-युक्रेन युद्धामुळे गुरुवारी सेन्सेक्स 2800 अंकांनी कोसळला होता. तर, निफ्टीमध्ये 842 अंकांची घसरण दिसून आली होती. मात्र, आज शेअर बाजार सावरताना दिसत आहे. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1190 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 414 अंकांनी वधारला.
अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. त्याशिवाय थेट युद्धात न उतरण्याचेही संकेत दिले. त्यानंतर अमेरिकन शेअर बाजार वधारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेअर बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटले. आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. जपानचा शेअर बाजार 1.4 टक्क्यांनी वधारला होता. तर, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1.2 टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसँग 0.2 टक्क्यांनी वधारला असल्याचे दिसून आले.
गुरुवारी घसरण
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजार कोसळला होता. गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा, केवळ 240 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 3084 शेअर्समध्ये घसरण झाली. 69 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमधील सर्वच क्षेत्रामध्ये 3 ते 8 टक्क्यांची तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. शेअर बाजारामध्ये झालेली घसरण ही 23 मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
- Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला? जाणून घ्या कारण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha