Share Market Updates : मागील आठवड्यात चढ-उतार पाहिलेल्या भारतीय शेअर  बाजारासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाचे अहवाल, आकडेवारी समोर येणार आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात 31 मे रोजी देशाच्या जीडीपीचे आकडे येणार आहेत.


शेअर बाजारातील व्यवहारावर अनेक घटक परिणाम करत असतात. वाढती महागाईची चिंतादेखील शेअर बाजारावर परिणाम करू शकते. त्याशिवाय परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार (FPI) किती गुंतवणूक करतात  आणि किती गुंतवणूक काढून घेतील याकडेही विश्लेषकांची नजर असणार आहे. 


स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे विश्लेषक संतोष मीना म्हणाले, “देशांतर्गत आघाडीवर या आठवड्यात अनेक आकडे येणार आहेत. त्यामुळे बाजार खूप 'व्यस्त' असणार आहे. जीडीपी वाढीचा दर, वाहन विक्री आणि पीएमआयची आकडेवारी प्रसिद्ध होणार आहे. जागतिक पातळीवरदेखील विविध देशांचे पीएमआय आकडे आणि अमेरिकेतील बेरोजगारीचे आकडे बाजाराच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे असतील असेही त्यांनी सांगितले. 


या दरम्यान, डॉलर निर्देशांकातील चढ-उतार आणि कच्च्या तेलाचे दरदेखील बाजारावर परिणामकारक ठरणार आहे. एफपीआयकडून जोरदार विक्री सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. 


या आठवड्यात अरविंदो फार्मा, जिंदल स्टील  आणि सनफार्मा सारख्या मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल येणे अपेक्षित आहे. 


रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले की, या आठवड्याची सुरुवात नवीन होणार आहे. गुंतवणुकदारांची नजर वाहन विक्री, सेवा, उत्पादन आणि पीएमआयच्या आकड्यांवर असणार आहे. त्याशिवाय, सर्वांना जीडीपीच्या आकड्यांची प्रतिक्षा आहे. 


मागील आठवड्यात बीएसईचा 30 स्टॉक्सच्या सेन्सेक्स निर्देशांकात 558.27 अंकाने वधारला होता. तर, निफ्टी 86.30 अंकाने वधारला.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: