मुंबई : एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ शेअर बाजारात काल लिस्ट झाला आहे. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर एनटीपीसी ग्रीनच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे एनटीपीसीनं ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीचं नियोजन केल्याचं समोर येत आहे. एनटीपीसी लिमिटेडनं अणू ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेता आहे. पुढील 23 वर्षांमध्ये 20 गिगावॅट ऊर्जा अणू ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचा एनटीपीसीचं नियोजन आहे. यासाठी 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एनटीपीसीकडून केली जाण्याची शक्यता आहे. 


इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार एका जाणकार व्यक्तीच्या माहितीनुसार  एनटीपीसी त्यांची अणू ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प भारतीय अणू ऊर्जा कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत संयुक्तरित्या उभारू शकते. त्यानंतर एनटीपीसी स्वतंत्रपणे या क्षेत्रात पुढील प्रकल्पांची उभारणी करु शकते. 


एनटीपीसीचं नियोजन काय? 


विकसित भारत या संकल्पनेनुसार 2047 पर्यंत एनटीपीसीला ग्रीन अँड क्लीन एनर्जी क्षेत्रात महत्त्वाचा वाटा मिळवायचा आहे. भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी  2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा अणू ऊर्जा प्रकल्पातून निर्माण करण्याचं नियोजन असल्याचं म्हटलं होतं. 


एनटीपीसी 2800 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प एनपीसीआयएल सोबत मार्च पर्यंत  राजस्थानच्या माही बान्सवाडा येथे  प्रकल्प सुरु करते. या ठिकाणी किमान 45 हजार ते 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 


एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्याकडून एक संयुक्त कंपनी स्थापन केली जईल. त्यानुसार अणू ऊर्जा वीज महामंडळ लिमिटेडच्या स्थापनेला देखील मंजुरी मिळाली आहे. यामध्ये एनपीसीआयएल ची भागिदारी 51 टक्के असेल 


एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं 2032 पर्यंत 60 गीगावॅट नवीकरणीयक्षम ऊर्जा निर्मितीचं धोरण ठेवलं आहे. हे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा एनटीपीसी ग्रीनला आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पासाठी 3.25 ला कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 


एनटीपीसी आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.  आज सकाळी 10.55 पर्यंत एनटीपीसीचा शेअर 364.70 रुपयांवर होता. तर एनटीपीसी ग्रीनचा शेअर 124.32 रुपयांवर पोहोचला आहे. अणू ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीच्या नियोजनामुळं एनटीपीसीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळणार का हे पाहावं लागेल. 


इतर बातम्या : 


PAN 2.0 प्रकल्पाद्वारे ई कार्ड मोफत मिळणार, प्रिंट हवी असल्यास पैसे भरावे लागणार, किती खर्च येणार?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)