Share Market Opening Bell: सोमवारी झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीने झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) 300 अंकांनी तर, निफ्टी (Nifty) 100 अंकांनी वधारला. प्री-ओपनिंग सत्रात बाजारात तेजी राहणार असल्याचे संकेत दिसून आले.


आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी वधारत 58259 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी वधारत 17414 च्या पातळीवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 505 अंकांनी वधारला असून 58,478.03 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीत 165 अंकांची तेजी दिसत असून 17,478.35 अंकांवर व्यवहार करत आहे.


सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. भारती एअरटेलच्या शेअर दरात घसरण झाली आहे. तर, निफ्टी 50 पैकी 49 शेअर्सचे दर वाढले आहेत. 


बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी आणि एनटीपीसीसह अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टेक महिंद्रा, पॉवरग्रीडच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.  


सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या निर्देशांकात 1.80 टक्क्यांनी वाढ झाली. तर, मेटलमध्ये 1.54 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. ऑटो निर्देशांक 1.43 टक्क्यांनी वधारला. 


SGX Nifty हा 17452 च्या पातळीवर व्यवहार करत असून यामध्ये 71.50 अंकांची तेजी दिसून येत आली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही तेजी राहणार असल्याचे संकेत दिसून येत होते.


शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'


सोमवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांक 1200 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरला. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 57,972 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 17,312 अंकांवर स्थिरावला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: