Share Market Opening Bell: मागील काही दिवस शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज लगाम लागला. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्सने (Sensex) 57 हजार आणि निफ्टीने (Nifty) 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसत असून केमिकस शेअर्समध्येही खरेदीचा जोर दिसत आहे. बुधवारी, अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असल्याचे म्हटले जात आहे.
आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 492.71 अंकांनी वधारत 57,090 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 157.45 अंकांनी वधारत 17,016 अंकावर खुला झाला होता. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 419 अंकांनी वधारत 57,017.91 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 125 अंकांनी वधारत 16,984.45 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आले. तर, पाच शेअरच्या दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 47 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली असून फक्त तीन कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
बँक निफ्टीत तेजी
मागील काही दिवस पडझड झालेल्या बँक निफ्टीत आज तेजी दिसून आली आहे. बँक निफ्टीत 500 अंकांची तेजी दिसून आली आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 बँकांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 312 अंकांनी वधारत 38,159.30 अंकांवर व्यवहार करत होता.
बुधवारी शेअर बाजारात घसरण
बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 509 अंकांनी आणि निफ्टी 148 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स 56,598 अंकांवर, निफ्टी 16,858 अंकांवर बंद झाला. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बँक, ऑईल अॅन्ड गॅस आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसला होता. तर, ऑटो, फार्मा आणि आयटीमध्ये खरेदी दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: