Share Market Opening Bell: दिवाळीपूर्वीच्या आठड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी साजरी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले. सेन्सेक्स (Sensex) 550 अंकांनी वधारला. तर, निफ्टीने (Nifty) 17400 चा टप्पा ओलांडला. अमेरिकन शेअर बाजारासह आशियाई बाजारातही निक्केई वगळता इतर निर्देशांकात तेजी दिसून आली.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सकारात्मक सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 333.15 अंकांनी वधारत 58,744 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126.95 अंकांनी वधारत 17,438 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 584 अंकांच्या तेजीसह 58,995.29 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 168 अंकांच्या तेजीसह 17,480.00 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीतील 50 पैकी 46 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, चार कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत.
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, एसबीआय, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचसीएल टेक, मारुती, एचयूएल. टीसीएस, टाटा स्टील, इन्फोसिस, नेस्ले, टायटन, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व, सन फार्मा आणि एचडीएफसीच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये अपोलो रुग्णालय, अॅक्सिस बँक, एचपीसीएल आणि डिवीज लॅबच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
सोमवारी बाजारात तेजी
सोमवारी, शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 492 अंकांच्या तेजीसह 58,410 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 134 अंकांच्या तेजीसह 17,320 अंकांवर बंद झाला.
बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, मेटल्स, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर दरात खरेदी दिसून आली.