भारतीय शेअर बाजारात आज तेजीसह सुरुवात झाली. बाजारात खरेदीचा उत्साह दिसत असून सेन्सेक्सने (Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्स 60250 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी (Nifty) निर्देशांक 18000 अंकांच्या नजीक पोहचला आहे. निफ्टी निर्देशांक 17900 अंकांच्यावर व्यवहार करत होता. बाजारात मिड कॅप शेअर दरातही तेजी दिसून येत आहे. 


आज शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287.11 अंकांच्या तेजीसह 60,246.96 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123.40  अंकांच्या तेजीसह 17,910.20 अंकावर खुला झाला. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 577  अंकांच्या तेजीसह 60,537.15 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 157 अंकांच्या तेजीसह 17,944.75 अंकांवर व्यवहार करत होता. 







प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 215 अंकांच्या तेजीसह  60175 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तरस, निफ्टी निर्देशांक 105  अंकांच्या तेजीसह 17892 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होते. 


सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. टाटा स्टील आणि एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर, 28 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील  47 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 3 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. 


शेअर इंडियाचे उपाध्यक्ष, संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की,  आज शेअर बाजार 17800-18200 च्या अंकांच्या दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता आहे. ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजी आणि वित्तीय सेवांच्या शेअर दरात तेजी राहण्याची शक्यता आहे. तर, मेटल, फार्मा, स्मॉलकॅप, आयटी आणि मीडियाच्या शेअर दरात विक्री होण्याची शक्यता आहे. 


शुक्रवारी बाजारात तेजी 


शुक्रवारी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे नफावसुलीदेखील झाली. त्यामुळे बाजारात अस्थिरता दिसून आली होती. शुक्रवारी, शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांच्या तेजीसह 59,959 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.85 अंकांनी वधारत 17,786 अंकांवर बंद झाला.