Sensex down 1200 points : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आजचा दिवस निराशाजनक असल्याचे चित्र आहे. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला. निफ्टीतही घसरण दिसून आली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला. ही घसरण दुपारच्या सत्रातही कायम राहिली.


अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू आहे. 


निफ्टी 50 मधील 45 स्टॉकमध्ये शेअर्स विक्रीचा सपाटा सुरू होता. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 28 स्टॉकमध्ये विक्रीमुळे घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीतील 12 पैकी 10 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे वर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स निर्देशांक 58 हजाराखाली आला आहे. दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1271 अंकांच्या घसरणीसह 57,771 अंकावर व्यवहार करत होता. 


सोमवारी प्री-ओपन सत्रापासूनच शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांनी घसरण होत 17,550 अंकांवर बाजार सुरू झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 517.42 अंकांनी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 58,499 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 193 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,422 अंकावर व्यवहार करत होता. 


अमेरिकेतील धोरणाचा परिणाम 


अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात फेडरल बँकेची महत्त्वाची बैठक होणार आहे. बुधवारी समारोप होणाऱ्या या बैठकीत व्याज दर वाढवण्यात येण्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून शेअर बाजारात विक्री करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजारात हाच कल दिसून येत आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणुकदारांनी 3148.58 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: