मुंबई: सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारात (Stock Market Updates) चांगलीच वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदी वातावरण आहे. आजही सेन्सेक्समध्ये 1,041 अंकांची वाढ झाली असून निफ्टीही 287 अंकांनी वधारला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून 0.75 टक्क्यांने व्याज दरवाढ केल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं चित्र आहे. आयटी, फायनान्स, मेटल आणि रिअॅलिटी क्षेत्रामध्ये चांगलीच तेजी असल्याचं दिसून आलं. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली. 


या चार गोष्टींमुळे आज शेअर बाजार वधारला


1. सकारात्मक जागतिक संकेत
अमेरिकेच्या फेडने व्याजदरात वाढ केल्यानंतर त्याचे परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. Dow Jones मध्ये 436 अंकांची वाढ झाली तर S&P मध्ये 102, Nasdaq Composite मध्ये 469 अंकांची वाढ झाली. आशियाई शेअर बाजारात तेजी असल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. 


2. यूएस फेडच्या व्याजदरात वाढ
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 27 जुलै रोजी त्याच्या व्याजदरात 0.75 अंकांनी वाढ केली. या व्याजदरामध्ये 100 अंकांना वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण 75 अंकांची वाढ झाली. फेडने भविष्यात व्याजदर हे 3 ते 3.5 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. फेडने केलेल्या व्याज दर वाढीमुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळाले आणि शेअर बाजार चांगलाच वधारला.


3. परकीय संस्थात्मक गुंतवणूक (FII) विक्री मंदावली
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी परकीय संस्थात्मक गुंतवणूक काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल अधिक होता. त्याचा परिणाम गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आला. या महिन्यामध्ये ही गुंतवणूक काढून घेण्याची गती मंदावली असल्याचं चित्र आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकीचा (FII) विचार करता जून महिन्यात 6.34 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची विक्री झाली होती, जुलै महिन्यात ती केवळ 14.6 कोटी डॉलर्स इतकी आहे. 


4. रुपया वधारला
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणाऱ्या रुपयाची किंमत आज 14 पैशांनी वधारली आहे. आज रुपयांची किंमत ही डॉलरच्या तुलनेत 79.77 इतकी आहे. त्याचा परिणामही शेअर बाजारावर झाल्याचं स्पष्ट आहे.