मुंबई : भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये या आठवड्यात 2200 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी 50 मध्ये देखील घसरणीचा ट्रेंड कायम आहे. भारतीय शेअर बाजारातील घसरणीला विविध कारणं आहेत. शुक्रवारी म्हणजेच आठवड्यातील बाजाराच्या शेवटी देखील घसरणीला ब्रेक लागू शकलेला नाही. या घसरणीचं एक कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार त्यांच्याकडील शेअरची विक्री करत भारतीय बाजारातील भागीदारी कमी करत आहेत. जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि भारतीय कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क होत आहेत, असं मानलं जातंय.
शुक्रवारी शेअर बाजारात सेन्सेक्सध्ये 730 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळं निर्देशांक 83476 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी 50 इंट्रा डेमध्ये 25648.40 अंकांवर पोहोचली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे. या पाच दिवसात सेन्सेक्स 2200 अंकांनी घसरला असून त्यात 2.6 टक्क्यांची घसरण झाली आहे तर निफ्टीमध्ये 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.9 जानेवारीला सेन्सेक्स 604 अंकांच्या घसरणीसह 83576.24 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 193.55 अंकांच्या घसरणीसह 25683.30 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. गुरुवारी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले होते.
Share Market Update : भारतीय शेअर बाजारातील घसरणीची कारणं?
अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
अमेरिकन सुप्रीम कोर्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत 9 जानेवारीला निर्णय देणार आहे. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेला तर शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळू शकतो. जर निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं गेला तर स्टॉक मार्केटच्या सेंटीमेंटला मोठा धक्का बसू शकतो.
नव्या टॅरिफचं संकट
अमेरिकन सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजून निर्णय दिल्यास ते रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेऊ शकतात. भारतासाठी हे अडचणीचं ठरू शकतं.
तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी सतर्कता
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार मोठ्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी सतर्क असल्याचं दिसून येतं. टीसीएस आणि एचसीएल या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सोमवारी जाहीर होणार आहेत. डीमार्ट रविवारी निकाल जाहीर करेल. तर, आयआरडीएकडून आज निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदांकडून जुलै 2025 पासून सुरु असलेला विक्रीचा ट्रेंड नववर्षात देखील कायम आहे. जानेवारी 2026 मधील आकडेवारीनुसार 8 जानेवारी पर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 8000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. म्हणजेच भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले आहेत.
अमेरिका भारत व्यापार करारवर प्रश्नचिन्ह
भारतीय शेअर बाजारातील घसरणीला भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत अनिश्चितता देखील कारणीभूत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात काही दिवसात व्यापार करार होईल, असं मानलं जातं होतं. मात्र, व्यापार कराराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अमेरिकेची इच्छा भारताचं शेती आणि डेअरी क्षेत्र खुलं करावं अशी आहे, त्याला मात्र भारताची तयारी नाही.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)