मुंबई: सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात खरेदीचा जोर दिसून आल्याने निर्देशांक वधारला. दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 240.98 अंकांनी वधारत 65,628.14 अंकावर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 93.50 अंकांच्या तेजीसह 19,528.80 अंकांवर बंद झाला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबर महिन्यात आपल्या व्याज दरात कोणताही बदल करणार नाही, असे संकेत दिसून आले. त्याचा, परिणाम आज बाजारावर दिसून आला. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.
मुंबई शेअर बाजारात मिडकॅपमध्ये 0.96 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.84 टक्क्यांची तेजी दिसून आली.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
आजच्या व्यवहारात निफ्टीच्या आयटी निर्देशांकात जोरदार वाढ झाली आहे. निफ्टी आयटी 650 अंकांनी अर्थात 2.06 टक्क्यांच्या तेजीसह 32,164 अंकांवर बंद झाला. याशिवाय बँकिंग, मेटल्स, ऊर्जा, मीडिया, ऑईल अॅण्ड गॅस, हेल्थकेअर आणि सार्वजनिक कंपन्यांच्या निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली आहे.
मिड कॅप निर्देशांकाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 385 अंकांच्या किंवा 0.98 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक 164 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 31 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.
| इंडेक्स | किती अंकांवर स्थिरावला | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
| BSE Sensex | 65,628.14 | 65,683.91 | 65,285.56 | 00:05:20 |
| BSE SmallCap | 37,734.14 | 37,828.34 | 37,595.79 | 0.84% |
| India VIX | 10.96 | 11.54 | 10.86 | -3.54% |
| NIFTY Midcap 100 | 39,830.35 | 39,885.30 | 39,445.60 | 0.98% |
| NIFTY Smallcap 100 | 12,550.75 | 12,595.50 | 12,386.45 | 1.33% |
| NIfty smallcap 50 | 5,793.80 | 5,821.80 | 5,709.70 | 1.47% |
| Nifty 100 | 19,485.50 | 19,499.75 | 19,382.95 | 0.53% |
| Nifty 200 | 10,440.75 | 10,447.90 | 10,378.95 | 0.60% |
| Nifty 50 | 19,528.80 | 19,545.15 | 19,432.85 | 0.48% |
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.74 लाख कोटीची वाढ
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 315.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी, बाजार भांडवल हे शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी 312.41 लाख कोटी रुपये होते. बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे मार्केट कॅप आज सुमारे 2.74 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
2297 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ
मुंबई शेअर बाजारात आज वधारत बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3941शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2297 शेअर्स वधारत बंद झाले. त्याच वेळी, 1462 कंपन्यांच्या शेअर्समध्ये समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 182 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 402 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 29 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांच्या 52 आठवड्यांच्या नव्या नीचांकाला स्पर्श केला.