मुंबई :  भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली. शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा सपाटा दिसून आल्याने निर्देशांक घसरणीसह स्थिरावला. बँकिंग स्टॉक्समध्ये (Banking Stocks) तेजी दिसून आल्यानंतर ही बाजार घसरणीसह बंद झाला. मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap Index) इंडेक्समधील स्टॉक्सच्या दरात फारसा बदल झाला नाही. बाजारातील घसरणीमुळे आजही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. आजच्या व्यवहारात फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, रियल्टी आणि कमोडिटीच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. 


आज शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 221.09  अंकांच्या घसरणीसह 66,009.15 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 50 अंकांनी घसरून 19,674.25 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


सेन्सेक्स निर्देशांकात विप्रोच्या शेअर दरात 2.36 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, एचडीएफसी बँके, पॉवरग्रीड, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. 


जेपी मॉर्गनच्या निर्णयाने बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी 


जून 2024 पासून अब्जावधी डॉलर्सची विदेशी गुंतवणूक भारतीय सरकारी रोख्यांमध्ये येऊ शकते. जेपी मॉर्गन चेसने बेंचमार्क इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारत सरकारचे रोखे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 जून 2024 पासून, JPMorgan सरकारी बाँड निर्देशांक – उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत सरकारचे सरकारी रोखे समाविष्ट करेल. या वृत्तानंतर, आज बँकिंग क्षेत्रातही तेजी दिसली आणि सर्व सार्वजनिक बँकिग स्टॉक्स तेजीसह बंद झाले. 


गुंतवणूकदारांचा फटका 


मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 सप्टेंबर रोजी 317.78 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल 317.90 लाख कोटी रुपये होते. शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे बाजार भांडवलात 12 हजार कोटींची घट झाली. बुधवारी झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 2.45 कोटी रुपयांनी घसरले होते.


'वेदांता'ने गाठला 52 आठवड्यांचा नीचांक 


वेदांत लिमिटेडचा शेअर शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. यासह, दिवसाच्या व्यवहारात वेंदांताचे शेअर्स 222.55 रुपयांवर पोहोचला. वेदांताच्या शेअर्सने 52 आठवड्यातील नीचांक गाठला. NSE वर शुक्रवारी वेदांताचा शेअर्स 0.38 टक्क्यांनी घसरून 225.65 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने 2500 कोटी रुपयांपर्यंत उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे वृत्त असतानाही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.